आताची सर्वात मोठी बातमी । भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर

 ​Maharashtra Political Crisis :शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.  

Updated: Jun 23, 2022, 09:00 AM IST
आताची सर्वात मोठी बातमी । भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर title=

मुंबई : Maharashtra Political Crisis :शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना असलेली ऑफरच शिंदेंना भाजपने दिल्याची माहिती समोर येत आहे. 

उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रिपदं शिंदे गटाला मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के खाती मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातल्या 6 मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्या सहाही मंत्र्यांना नवा सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात आणखी चार आमदार सामील झाले आहेत. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह योगेश कदम, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित हे चार आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. हे चारही आमदार हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये दाखल झाले. 

उद्धव ठाकरेंच्या आव्हानानंतर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून उत्तर दिले आहे. अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा,असं आवाहन त्यांनी आपल्या ट्विटमधून केलंय. गेल्या अडीच वर्षात केवळ घटकपक्षांचाच फायदा झाला मात्र यात शिवसैनिक भरडले गेले. शिवसेनेचं पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्यात आलं. त्यामुळे आता महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे, असं ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे. 

गुवाहाटीमध्ये सध्या बंडखोर आमदारांची जोरदार खलबतं सुरु आहेत. त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात प्रताप सरनाईक हे भरत गोगावले यांच्याशी बोलत आहेत, त्यांना पक्षप्रतोदाच्या अधिकारांची माहिती देताना ऐकायला येतंय. आता तुमची जबाबदारी वाढलीय. सगळ्या आमदारांना व्यवस्थित सांभाळा असा सल्लाही त्यांनी दिलंय. इतकच नाही या चर्चेवेळी तर आधीचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यावर त्यांनी टीकाही केली आहे.