नाशिक: विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यामुळे भाजपला नगरमध्ये फायदा होण्याऐवजी तोटाच झाला, असे वक्तव्य माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले. नाशिकच्या वसंत स्मृती भाजप कार्यालयात उत्तर महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राम शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांना टोला लगावला. विखे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात १२-० अशा विजय मिळवू, असा दावा केला होता. मात्र, त्यांचा हा दावा सपशेल फोल ठरला होता.
'काँग्रेसच्या नेत्यांनी इच्छाशक्ती दाखवली असती तर निकाल वेगळा असता'
या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी म्हटले की, पक्षातील इनकमिंगचा काही फायदा झाला नाही. नगरमध्ये भाजपचे पाच आमदार होते. विखे आणि पिचड आल्यानंतर ती संख्या सातवर गेली होती. त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित होते. पण निवडणुकीत भाजपचे फक्त तीनच आमदार निवडून आले. त्यामुळे विखे यांना घेऊन फायदा नव्हे तोटाच झाला. विखेंची काही फार ताकद होती, असे नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथे जातात, तिथे वातावरण बिघडवतात, असे राम शिंदे यांनी म्हटले.
या बैठकीला पराभूत उमेदवारांपैकी तीनजण उपस्थित नव्हते. या बैठकीला आशिष शेलार, राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी नेते उपस्थित होते. स्नेहलता कोल्हे यांनीही राधाकृष्ण विखे-पाटलांविषयी नाराजी व्यक्त केली. विखेंनी एका मतदारसंघात स्वत:च्या मेव्हण्याला अपक्ष म्हणून उभे केले होते. पण त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, असा टोला त्यांनी लगावला.