'काँग्रेसच्या नेत्यांनी इच्छाशक्ती दाखवली असती तर निकाल वेगळा असता'

इच्छाशक्ती असेल तर काहीही घडू शकते. 

Updated: Dec 14, 2019, 06:37 PM IST
'काँग्रेसच्या नेत्यांनी इच्छाशक्ती दाखवली असती तर निकाल वेगळा असता' title=

पुणे: विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याप्रमाणे काँग्रेसच्या नेत्यांनीही ताकद पणाला लावली असती तर आज वेगळा निकाल पाहायला मिळाला असता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ते शनिवारी पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांचे कान टोचले. अजित पवार यांनी म्हटले की, इच्छाशक्ती असेल तर काहीही घडू शकते. यामुळे महाविकास आघाडी उदयाला आली. विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांसारखा झंझावात काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवला असता तर आज वेगळे चित्र दिसले असते. पुणेच काय संपूर्ण राज्यात वेगळे निकाल लागले असते, असे अजित पवार यांनी म्हटले. 

यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कौतुकही केले. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार निवडून आले. त्यामुळे पुण्याला किमान तीन मंत्रिपदे मिळावीत, अशी मागणी केल्याचे अजितदादांनी सांगितले. सगळ्यांनी मनापासून काम केले असते तर खडकवासल्याची जागाही राष्ट्रवादीने जिंकली असती. मात्र, आता जे गेले त्यांना परत घेण्याच्या भानगडीत पडू नका. कुणावाचून कुणाचं अडत नाही. स्टेजवरच्या नेत्यांनी याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले. 

जी खाती १५ वर्षे आपल्याकडे नव्हती ती आपण घेतली आहेत. आणखी एखाद दुसरं खातही मिळू शकते. महापालिका निवडणुकीसाठी चारऐवजी एक किंवा दोन वॉर्डांचा एक प्रभाग होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पुण्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, असा विश्वासही यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला.