Loksabha Election: भंडारा लोकसभा निवडणुकीमध्ये अचानकच एक नवीन ट्विस्ट आला आहे. भाजपाचे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संजय कुंभलकर हे बसपा तर्फे उमेदवारी अर्ज भरणार असल्याने या निवडणुकीला वेगळी रंगत निर्माण झालेली आहे. भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुनील मेंढे याच्या उमेदवारीला भाजपामधून मोठ्या प्रमाणात विरोध होता. संजय कुंभलकर यांच्यामुळे भाजपामध्ये उभी फूट पडलेली असल्याचे चित्र आहे. सुरवातीपासून सुनील मेंढे यांचा विरोध करणाऱ्या भाजपाच्या विरोधकांना कुंभलकर यांच्या निमित्ताने एक नवीन संधी चालून आली आहे. भाजपा आणि काँग्रेसच्या दोन कुणबी समाजाच्या उमेदवारांमध्ये कुंभलकर हे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यासर्व घडामोडीमुळे भाजपाचे उमेदवार सुनील मुंढे यांची धाकधूक वाढलेली आहे.
भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपातर्फे सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, काँग्रेस तर्फे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक या दोघांमध्येच होईल अशी शक्यता असतानाच अचानक भाजपाचे महामंत्री संजय कुंभलकर यांनी भाजपला रामराम ठोकत त्यांनी बसपा तर्फे उमेदवारी मिळविल्याने या मतदारसंघात आता तिहेरी लढत होणार आहे. कारण भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात कुणबी आणि तेली समाजाची संख्या सर्वाधिक आहे. भाजपा आणि काँग्रेस तर्फे रिंगणात उभे असलेले उमेदवार हे कुणबी समाजाचे आहे तर कुंभलकर हे तेली समाजाचे आहेत.
३ मार्च रोजी तेली समाजाचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात एक ठरावदेखील घेण्यात आला होता. जर भाजपा आणि काँग्रेस तर्फे तेली समाजाला नेतृत्व मिळाले नाही तर आम्ही तेली समाजाचा उमेदवार उभा करू आणि सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष विसरून तेली समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहु. या ठरावानुसार संजय कुंभलकर यांनी भाजपाची साथ सोडून बसपाची उमेदवारी मिळवली असून आज ते त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
संजय कुंभलकर उमेदवारीवर जर ठाम राहिले आणि संपूर्ण तेली समाज एकवटला तसेच भाजपामधून सुनील मुंढे यांना अगदी सुरुवातीपासून बराच विरोध होत होता. ते विरोधकही जर संजय कुंभलकर यांच्या पाठीशी उभे राहिले तर या तिहेरी निवडणुकीत कुंभलकर बाजी मारू शकतात किंवा त्यांनी घेतलेल्या मतदानाचा फटका हा सुनील मेंढे यांना बसू शकतो. तसंच, संजय कुंभलकर यांच्या बंडखोरीचा फायदा हा काँग्रेसच्या उमेदवारालाही होऊ शकतो. त्यामुळे या तिहेरी निवडणुकीकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.