नाराजीबाबत कोणतीही चर्चा नाही- एकनाथ खडसे

 जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही भेट झाल्याचे एकनाथ खडसे यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. 

Updated: Jan 3, 2020, 11:50 AM IST
नाराजीबाबत कोणतीही चर्चा नाही- एकनाथ खडसे  title=

जळगाव : देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हेच माझं तिकीट कापण्यात कारणीभूत आहे असा गौप्यस्फोट भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. दरम्यान, खडसे शिवसेनेच्या संपर्कात होते असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबाबत संकेतही दिले होते. या पार्श्वभुमीवर खडसेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जळगावात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही भेट झाल्याचे एकनाथ खडसे यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. 

या पार्श्वभुमीवर भाजपच्या तीन प्रमुख नेत्यांची जळगावात भेट झाली. यावेळी खडसेंच्या नाराजीवर चर्चा होणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. 

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली. या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही खडसे म्हणाले. भाजपात नाराजीबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावे पाठवली होती. या पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस आणि गिरिश महाजन आणि माझ्यात भेट झाल्याचे खडसे म्हणाले. जळगाव जिल्हा परिषदेवर गेली वीस वर्षे भाजपची सत्ता आहे. भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.

नेतृत्वावर प्रश्न 

मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे यांनी जे पी नड्डा यांच्याशी बातचीत करून राज्याच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावेही सादर केले होते. खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या बैठकीत खडसे आणि महाजन या दोघांनीही खेळीमेळीने आमच्यात आनंदीआनंद असल्याचं सांगितलं होतं. या सर्वामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या.