अमरावती : 'ही युती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड, ती तुटणार नाही' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. युतीच्या प्रचाराला अमरावतीतून सुरूवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी युतीचे गुणगान गायले आणि युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. लोकसभा निवडणुकीचा हा पहिलाच मेळावा आहे. ही युती केवळ दोन संघटनांची युती नाही. ही विचारांची युती आहे. आम्हाला अभिमान असल्याचे आम्ही हिंदुत्ववादी संघटना आहोत. ज्याला हिंदुत्वा बद्दल प्रेम आहे त्या सर्वांचे स्वागत आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरीत असलेल्या दोन पक्षांची युती आहे.
युतीमुळे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काहींनी घाबरून आधीच माघार घेतल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी पवारांचे नाव न घेता लगावला आहे. काही कॅप्टन्सनी आपण लढणार असल्याचे जाहीर केले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला. पण त्यानंतर आपण लढणार नसल्याचेही त्या कॅप्टनने जाहीर केले असेही ते म्हणाले.
जिथे कमळ तिथे कमळ आणि जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण हेच पक्के आहे. भाजपा आणि शिवसेना युती ही निवडणुकीपुरती नाही तर ही अभेद्य युती आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिथे भाजपाचा उमेदवार असेल तिथे शिवसेनेचा कार्यकर्ता रक्ताचे पाणी करेल आणि जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे भाजपाचा कार्यकर्ता रक्ताचे पाणी करेल असे आवाहनही त्यांनी केले. आपले सरकार येण्याच्या आधी इथे गरीबी हटली नव्हती. पण इथल्या गरीबांची बॅंकेत खाती तयार झाली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गरीबांना घर मिळाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.