प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपासाठी हा विजय महत्वाचा मानला जात आहे, कारण भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनीच भाजपाविरोधात बंडाचं निशाण फडकावलं होतं. दुपारी १२ नंतर आलेल्या निकालात भाजप बंडखोर अनिल गोटे यांच्या पक्षाला अवघ्या ०२ जागा मिळाल्या आहेत. भाजप ३७ जागांवर आघाडीवर आहे, शिवेसना ०७ जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस-राष्ट्रवादी १४ जागांवर तर इतर ०३ जागांवर आघाडीवर आहेत.
यात अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे आणि त्यांचा मुलगा थोड्याशा फरकाने म्हणजे अवघ्या ८ ते १० मतांनी पिछाडीवर आहेत, या निकालाकडे धुळेकरांचं मोठ्या प्रमाणात लक्ष लागून आहे.
अनिल गोटे यांनी गिरीश महाजन यांना देखील अनेक सभांमधून आव्हान दिलं होतं, यात अनिल गोटे यांच्या उमेदवारांची चिन्हं वेगवेगळी असल्याचं गोंधळ झाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पण अनिल गोटे यांची धुळेकरांवर असणारी जादू कमी होत असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे भाजपने गुंड प्रतिमा असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याने टीका झाली होती. त्यातील देवा सोनार हा उमेदवार अजूनतरी पिछाडीवर आहे.
भाजप आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना देखील जाहीर आव्हान दिलं होतं, म्हणून ही निव़डणूक अधिक रंगात आली आणि चर्चेत राहिली. मतदानाच्या आदल्या रात्री देखील धुळ्यात मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू होती. अनिल गोटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केल्याने पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता, त्या विरोधात देखील अनिल गोटे यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे.