मुंबई : घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविला. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्यावर कुत्सित उत्तर पाठवलं. त्यांच्या याच भूमिकेवर निशाणा साधत जाणत्या राजाला असा दृष्टीकोन शोभत नाही, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
राज्यपालांनी पाठविलेल्या कार्यअहवालावर शरद पवार यांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हा अहवाल पाहिला तर, त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या २८ नोव्हेंबरच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ३० डिसेंबरच्या शपथविधीचीही छायाचित्रे आहेत. शरद पवार यांना ही छायाचित्रे खटकतात की, त्यांना आता सध्याच्या परिस्थितीमुळे असे सरकार सत्तेवर आणल्याचाच पश्चात्ताप होतो, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे असा आग्रही सूर आळवत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
राज्यपालांनी रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करणे, पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणे, नंदूरबार जिल्ह्यात आदिवासींसोबत नृत्याचा ठेका धरणे, जालना येथे पन्नास हजार विद्यार्थ्यांसाठीच्या माध्यान्ह भोजन प्रकल्पाचे लोकार्पण करणे अशी छायाचित्रे शरद पवार यांना दिसली नाहीत, याबाबत पाटील यांनी उपरोधित स्वरात आश्चर्य व्यक्त केल.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरे उघडण्याबद्दल लिहलेले पत्र हे ऑक्टोबर महिन्यातील आहे आणि हा वार्षिक अहवाल सप्टेंबर महिन्यापर्यंतचा आहे. या कालावधीचेही जाणत्या राजाला भान राहिले नाही आणि ते अहवालात पत्र शोधत राहिले, हे आश्चर्यकारक म्हणत त्यांनी राजकीय भाषेत पवारांना निशाणा केल्याचं पाहायला मिळालं.