रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली असून आज दुपारी देशमुख आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे.
भाजपने सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांना मुंबईत बोलवलं आहे. पृथ्वीराज देशमुख हे माजी अपक्ष आमदार आहेत. युतीच्या काळात त्यांनी शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. पृथ्वीराज हे माजी स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांचे पुतणे आहेत.
1995 ला अपक्ष उमेदवार संपतराव देशमुख यांनी तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांच्या पराभव केला होता. मात्र आमदार झाल्यावे दोन अडीज वर्षातच त्यांचं निधन झालं. त्यांनतर झालेल्या पोट निवडणुकीत त्यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांना निवडणूक लढवली. पृथ्वीराज देशमुख यांनी पोट निवडणुकीत पतंगराव कदम यांच्या पराभव केला होता. आणि आपल्या काकांच्या प्रमाणे युतीला समर्थन दिले होते.
मात्र 1999 ला राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचे पतंगराव कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
2004 त्यांनी निवडणुकीत लढवली नाही. 2009 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून पतंगराव कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते.
2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे पृथ्वीराज देशमुख आणि काँग्रेसचे पतंगराव कदम अशी निवडणूक झाली. मात्र यात पतंगराव कदम पुन्हा विजयी झाले. सांगली जिल्ह्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी पृथ्वीराज देशमुख यांनी फार प्रयत्न केले. 2015 नंतर भाजपने त्यांना सांगली जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद दिले. पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत बंधू संग्रामसिंह देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहे. तसेच ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आहेत.
3 वर्षा पूर्वी वोलचंद कोलेजेचा ताबा खासदार संजय काका पाटील यांनी घेतल्या पासून जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदर संजय काका पाटील असा उघड संघर्ष बघायला मिळाला होतो. मात्र जिल्ह्यातील सर्व निवडणुकात भाजपाच्या विजयात देशमुख यांनी मोलाची कामगिरी केली.
यंदा लोकसभा निवडणुकी वेळी सुद्धा संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी भाजपातील नेत्यांची नाराजी दूर करून संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी भाजपचे संजय काका पाटील हे 1 लाख 64 हजार मतांनी निवडून आले. मात्र पृथ्वीराज देशमुख यांच्या पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानीचे विशाल पाटील यांना 5 हजारच मताधिक्य मिळाले.
दरम्यान मध्यंतरी झालेल्या विधानपरिषद जागेसाठी पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मंत्री महादेव जानकर यांच्यासाठी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. मात्र भाजपमधील योगदानाबद्दल पक्षाने त्यांना आता विधानपरिषदेला उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे. आज दुपारी पृथ्वीराज देशमुख आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती आहे.
राजकीय समीकरणे :
१. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सांगली जिल्ह्यातीलच उमेदवाराला संधी देणे.
२. भाजपचे कट्टर कार्यकर्ते नेते अशी ओळख असणारे पृथ्वीराज देशमुख याना आमदारकी देऊन न्याय देणे.
३. भाजपचे सांगली जिल्ह्यात चार आमदार असून ही अद्याप या आमदारांपैकी कोणाला मंत्रीपद देण्यात आलं नाही, त्यामुळे नाराज गटातील पृथ्वीराज देशमुख यांना आमदार म्हणून संधी देन्यात आली असल्याची चर्चा.
४. काँग्रेस आमदार विश्वजित कदम हे भाजपाचा वाटेवर आहेत, अशी चर्चा अनेक वेळा रंगली आहे. शिवाय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी विश्वजित यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर पण दिली होती. जर यदा कदाचित कदम भाजपमध्ये आले तर, कदम आणि देशमुख घराण्यातील संघर्ष होऊ नये म्हणून आत्ताच देशमुख गटाला आमदारकी दिल्याची ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.