राज्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा उघड, 'त्या' ३२ जणांची नोकरीही जाणार

महाराष्ट्र राज्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्राचा घोटाळा उघडकीस आला आहे.  

Updated: Oct 7, 2020, 06:22 PM IST
राज्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा उघड, 'त्या' ३२ जणांची नोकरीही जाणार  title=

विशाल करोळे / अमर काणे / औरंगाबाद : राज्यात बोगस क्रीडा प्रमाणपत्राचा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल २५९ जणांनी ट्रम्पोलिन आणि टंबलिंग या खेळांचे बोगस क्रीडाप्रमाणपत्र मिळवल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. राज्यातील बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाल्याने ३२ जणांच्या सरकारी नोकऱ्या जाणार आहेत.

बाजारांतून एक लाखांपासून ते तीन लाखांना ही क्रीडा प्रमाणपत्रे विकत घेतली होती. २५९ जणांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर ही सगळी प्रमाणपत्र क्रीडा विभागाने रद्द केली आहेत. धक्कादायक म्हणजे या प्रमाणपत्राच्या आधारे तब्बल ३२ जणांनी विविध खात्यांत सरकारी नोकरी सुद्धा मिळवली. या सगळ्यांची नोकरी आता जाणार आहे. या २५९ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे, येत्या दोन दिवसात औरंगाबाद पोलिसात हा गुन्हा दाखल होईल. 

आता बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक केली आहे. राज्यात अनेकांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी लाटली. यासंदर्भातल्या तक्रारी समोर आल्यानंतर क्रीडा, युवक सेवा संचलनालयानं चौकशी सुरू केली.

सुरुवातील औरंगाबादेतील काही अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी झाली. त्यानंतर यातील नागपूर कनेक्शन समोर आले. मनकापूर पोलिसांनी पीएसआय संजय सावंत याला अटक केली होती. संजय सावंत याने पॉवर लिफ्टिंगच्या बनावट प्रमाणपत्राच्याआधारे पीएसआयची पोस्ट मिळवली होती. 

संजय सावंतच्या तपासात त्याचा भाऊ रवींद्र सावंतनही बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचे समोर आले. त्यामुळे नागपूर पोलिसांनी सांगलीहून शिक्षणाधिकारी रवींद्र सावंत याला अटक केली. राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा गोरखधंदा सुरु असल्याचं 'झी २४ तास'ने समोर आणले होते. त्यानंतर 'झी २४ तास'च्या पाठपुराव्याला आता यश येत असून, याप्रकरणात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.