ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासलं

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप

Updated: Dec 5, 2021, 03:11 PM IST
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासलं

विशाल सवने, झी 24 तास नाशिक :  ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला काळं फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजी ब्रिगेडनं गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत हे काळं फासलं आहे. 

नाशिकमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

दुपारच्या सुमारास परिसंवाद होणार होता. मुख्य गेटजवळ गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्यावर काळं फासण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या दोन लोकांनी पत्रकंही भिरकावली. छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध असं या पत्रकात लिहिण्यात आलं होतं. 

पोलिसांनी काळं फासणाऱ्य़ा संभाजी ब्रिगेडच्या दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे. मात्र या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो. अशा प्रकारे व्यक्त होणं हे चुकीचं आहे. 

'आम्ही या घटनेचा निषेध करतो. सुंदर चाललेल्या संमेलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही', जयप्रकाश जातेगावकर यांनी आपली प्रतिक्रिया झी 24 तासला दिली आहे. या घटनेनंतर गिरीश कुबेर परिसंवादासाठी व्यासपिठावर उपस्थित होते. तसंच साहित्य संमेलनातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.