नाशिकमध्ये बस जळीतकांडाची एकाच दिवशी दुसरी घटना, सत्पश्रृंगी गडावर बसने घेतला पेट

नाशिकमध्ये खासगी बसला आगीनंतर गडावर बसला आग लागल्याने प्रवाशी हादरले

Updated: Oct 8, 2022, 01:45 PM IST
नाशिकमध्ये बस जळीतकांडाची एकाच दिवशी दुसरी घटना, सत्पश्रृंगी गडावर बसने घेतला पेट title=

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये खासगी ट्रॅव्हल बस जळीतकांड (Nashik Bus Fire) ताजे असतांनाच नाशिकच्या सप्तशृंगी गडावर (Saptashrungi) परिवहन महामंडळाच्या (ST Corporation) बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सध्या गडावर कोजागिरी पौर्णिमा उत्सावासाठी मोठी भाविकांची गर्दी सुरू आहे. यावेळी यात्रेसाठी बनविलेल्या तात्पुरत्या बस स्थानकावरील शॉर्ट सर्किटमुळे बसने पेट घेतला आणि क्षणात आगीने रौद्ररूप धारण केलं. बस पेटली त्यावेळी बस प्रवाश्यानी पूर्णपणे भरली होती. 

सुदैवाने प्रवाशी तात्काळ खाली उतरल्याने मोठी जिवीत हानी टळली. स्थानिक नागरिक आणि गडावरील चालतं - बोलत मदत केंद्राच्या कार्यकर्ते तसंच रोपवे अधिकारी कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.आगीत बसचा पुढील भाग जळून खाक झाला.

दरम्यान, आज पहाटे नाशिकमध्ये खाजगी बसला लागलेल्या या आगीत 12 जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्यावतीने 5 लाख रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जाणार आहेत. 

ट्रकच्या डिझेल टँकला बसने धडक दिल्याने या टँकने पेट घेतल्याची प्रथमदर्शनी माहिती आयुक्तांनी दिली आहे. या अपघाताची सखोल चौकशी केली जाणार असल्याचंही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.