महिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश!

Success Story : परिस्थिती ही कायमच एकसारखी राहत नाही, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंय. दादासाहेब भगत या व्यक्तीकडे आणि त्याच्या यशाकडे पाहून याचाच अंदाज येतोय.   

सायली पाटील | Updated: Oct 19, 2024, 03:46 PM IST
महिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश! title=
business news man who worked as office boy at Narayana Murthys Infosys earned Rs 9000 salary is now CEO of 2 startups

Success Story : दादासाहेब भगत... नाव वाचून ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे तुमच्या लक्षातही येणार नाही. पण, या व्यक्तीचा प्रवास आणि यशोगाथा वाचून मात्र लगेचच त्यांचा हेवा वाटल्यावाचून राहणार नाही. कामाचं स्वरुप मोठं असो किंवा लहान, कोणतंही काम मुळातच कमीपणाचं नसतं आणि ते कामच तुम्हाला पुढे जाण्याची संधी देतं हे विसरून चालणार नाही. 

दादासाहेब भगत हे त्यातलंच एक नाव. जिद्द, चिकाटी आणि एकनिष्ठेसोबतच हार न मानण्याच्या वृत्तीनं तुम्ही यशशिखर गाठू शकता हेच त्यांनी दाखवून दिलं. आयटीआयमधील डिप्लोमापर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर मुळचे बीडचे रहिवासी असणारे भगत पुण्यात पोहोचले. इथंच Infosys मध्ये त्यांनी ऑफिस बॉय म्हणून त्यांनी नोकरी सुरू केली. महिना 9000 रुपये पगार घेणाऱ्या भगत यांनी अॅनिमेशन कोर्सचं शिक्षण घेणं सुरु ठेवलं. 

अॅनिमेशननंतर त्यांनी पायथॉन आणि सी प्लसप्लस अशा कॉम्प्युटर लँग्युएजचंही शिक्षण घेतलं. इथूनच त्यांना त्यांच्या पहिल्या कंपनीचा पाया रचण्याची प्रेरणा मिळाली. Ninthmotion असं त्यांच्या कंपनीचं नाव. आता कुठं भगत यांच्या करिअरला गती मिळण्यास सुरुवात झाली आणि तितक्यातच त्यांचा एक अपघात झाला. पण, या अपघातानंतरही त्यांच्या वाटेत अडथळे निर्माण झाले नाहीत.  भगत यांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं आणि यातूनच आणखी एका कंपनीचा जन्म झाला. 

DooGraphics असं त्यांच्या दुसऱ्या कंपनीचं नाव. या वेबसाईटवर कॅन्वासारखे डिझाईन आणि टेम्पलेट तयार करता येतात. कोरोना काळात भगत यांनी त्यांच्या कामाचा संपूर्ण गाशा गुंडाळत बीडमधून एक नवी सुरुवात केली. इथं त्यांनी गोठ्यातून आपल्या संघर्षाला आणि स्वप्नांना नवी दिशा दिली. साथ होती ती खास आणि कौशल्यवान मित्रांची. 

हेसुद्धा वाचा : भीतीचा कडेलोट करणारा Horror Movie; रात्रीच्या वेळी तर अजिबात पाहू नका 'हा' चित्रपट

'शार्क टँक इंडिया 3' मध्येही भगत यांची ही कर्तबगारी पोहोचली आणि तिथं अमन गुप्ता यांनी या नवउद्यमीला आर्थिक मदतही देऊ केली. या गुंतवणुकीच्या बळावर दादासाहेब भगत यांनी कोट्यवधींची रक्कम कमवत स्वप्नांचा अगदी सच्चेपणानं पाठलाग केला तर काय किमया होते हे दाखवून दिलं.