Caste for Fertilizer : शेतकऱ्याला खत (Fertilizer) देताना जात (Caste) विचारण्यात येत होती. यावरुन शेतकऱ्यांतून ( Farmer ) तीव्र नाराजी व्यक्त होत होती. खतासाठी जात विचारण्याचा गंभीर प्रकार 'झी 24 तास'ने उघड केल्यावर त्याची दखल विधानसभेतही घेण्यात आली. (Zee 24 Taas Impact ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारला यासंदर्भात जातीचा रकाना वगळण्याच्या सूचना केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
खत विक्रेत्याला जात सांगितल्याशिवाय शेतकऱ्याला खत मिळणार नाही या 'झी 24 तास'च्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनंतर विरोधक आक्रमक झालेत. शेतकऱ्याला जात विचारणं अशोभनीय असून विधिमंडळात प्रश्न विचारणार असल्याचं सांगितले होते. त्यानंतर हा मुद्दा विरोधकांनी विधानसभेत उचलून धरला.
खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगण बंधनकारक केल्याचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट 'झी 24 तास'ने दाखवला. आता विधीमंडळातही त्याचे पडसाद उमटलेत. विधीमंडळात यावर आवाज उठवू असा इशारा माजी मंत्री सतेज पाटील यांनी दिला होता. शेतकऱ्यांना जात का विचारली जातेय. निवडणुकीत याचा वापर केला जाणार आहे का, असा सवालही त्यांनी केला होता.
खत घेताना जात विचारण्याचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडेंनी दिली होती. तर शेतकऱ्यांना जात विचारली जात असेल तर ते चुकीचं असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी म्हटले होते. कृषीमंत्र्यांशी चर्चा करुन यांदर्भात तोडगा काढणार असल्याचं त्यांनी 'झी 24 तास'शी बोलताना सांगितले होते. एससी, एसटीसाठी काही योजना असेल तर जात विचारली गेली असेल. मात्र जात विचारून खत देणं चूकच आहे, असं भाजप आमदार संजय कुटे यांनी म्हटले.
दरम्यान, जातीच्या रकान्यात हिंदुस्तान म्हणून लिहू शकतात, असा सल्ला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला. तर प्रत्येक गोष्टीत जात विचारली जाणार असेल तर सरकारला जनताही महाराष्ट्र धर्म दाखवेल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही 'झी 24 तास'च्या बातमीची दखल घेतली. खतासाठी शेतकरी बांधवांना जात सांगावी लागणं हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे. अजून कोणाकोणाला जात विचारणार आहे हे सरकार, असा सवाल अंबादास दानवेंनी केला. शेतकऱ्याला जात विचारणं चुकीचं, दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.