सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील मालमत्तेवर ईडीने कारवाई केली. या कारवाईने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पहिल्यांदाच यासंदर्भात एक मोठं विधान केलं आहे.
'मंत्र्यांना बायको नाही तर मेहुणा अडचणीत आणतो, नाहीतर चहापेक्षा किटली गरम असलेले पीए' असं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सांगलीत एक कार्यक्रम पार पडला. यानंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नितीन गडकरी म्हणाले, माझा अनुभव आहे की, मंत्र्यांना अडचणीत बायको नाहीतर मेहुणा अडचणीत आणतो, नाहीतर चहापेक्षा किटली गरम असलेले पीए. मी माझ्या मेहुण्याला तुझं काम असेल तरच माझ्याकडे ये असं सांगितल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. लोकांची काम घेऊन नेतेगिरी करण्याचा तुझा संबंध नाही, तू भानगडीत पडायचं नाही, असं सांगितल्याचंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
माझी मुलं राजकारणात नाहीत, ते कुणालाही माझा परिचय सांगत नाहीत. माझ्या पत्नीचं फिल्ड वेगळं आहे, माझ्या कामात ती हस्तक्षेप करत नाही, तिच्या कामात मी हस्तक्षेप करत नाही, असंही नितीन गडकरी यांनी मुलाखतीत पुढे सांगितलं.
दरम्यान, यावेळी बोलताना भविष्यात मुंबई पुणे रस्ता पुण्याच्या रिंगरोडला जोडल्यानंतर हाच मार्ग मुंबई ते बंगळुरू असा होईल, अशा घोषणा नितीन गडकरी यांनी केली.