औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीची सत्ता जायला हे गद्दार अब्दुल सत्तार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातून कार्यामुक्त करून त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी आपण शिवसेनेच्या नेत्यांकडे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलीय. आम्ही गेल्या २० वर्षांपासून वेगवेगळ्या संस्था ताब्यात घेण्यासाठी जीवाचे रान करतोय. जेलमध्ये गेलोय. मारही खाल्ला आहे. मात्र सत्तार यांच्या गद्दारीमुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला उपाध्यक्षपद गमवाव लागले, असेही खैरे म्हणाले. मात्र असे असले तरी अध्यक्षपद देवाच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाले, असेही खैरे म्हणाले.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर खासदार संजय राऊत यांनी खरमरीत प्रतिक्रीया दिली आहे. अब्दुल सत्तारांनी राजीनामा का दिला माहित नाही. जेव्हा मंत्री राजीनामा देतो तेव्हा तो मुख्यमंत्र्यांकडे जातो किंवा राजभवनात जातो, अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला की नाही याबाबतचं सत्य मुख्यमंत्री किंवा राजभवन सांगू शकतात. मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचा पूर्ण सन्मान राखून त्यांना मंत्री बनवले आहे. अशा छोट्या घटना होत राहतात. जे नाराज होतात, ते मुलत: शिवसैनिक नाहीत, बाहेरच्या पक्षातून शिवसेनेत आल्याने इथल्या सिस्टिममध्ये अँडजस्ट व्हायला वेळ लागेल.
दीपक सावंत खूप जुने जाणते शिवसैनिक. ते भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितले की, तुमच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहचवेन, असे सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. चंद्रकांत पाटील झोपेत असावेत, म्हणून त्यांना अशा प्रकारची स्वप्ने पडत असावीत. आघाडी सरकारमध्ये सुरूवातीला असे धक्के बसतात, नंतर गाडी सुरू झाल्यावर ती सुसाट धावते, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच उद्या बोलणार, असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. आज मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही. आजच मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, असे शिवसेनेचे नाराज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. ते औरंगाबाद मध्ये पत्रकारांशी बोलत होते. माझा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर आहे. त्यामुळे खैरे यांनी केलेल्या आरोपाबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील सत्तार यांनी स्पष्ट केले.