क्रिकेटचा 'वाघ' ताडोबाच्या जंगलात!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विक्रमवीर तेंडुलकर शुक्रवारी पोहोचला तो ताडोबाच्या जंगलात.

Updated: Jan 24, 2020, 11:25 PM IST
क्रिकेटचा 'वाघ' ताडोबाच्या जंगलात!

चंद्रपूर : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विक्रमवीर तेंडुलकर शुक्रवारी पोहोचला तो ताडोबाच्या जंगलात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात खरेखुरे वाघ पाहायला. शुक्रवारी सकाळी नागपूर विमानतळावर सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांचं आगमन झालं. तिथून तो ताडोबाच्या दिशेनं रवाना झाला.

चिमूर तालुक्यातील कोलारा प्रवेशद्वारातून त्याने ताडोबात प्रवेश केला. कोलारा इथल्या खासगी बांबू रिसॉर्टमध्ये सचिनचं आगमन झालं, तेव्हा त्याला पाहायला बघ्यांची ही गर्दी उसळली. दुपारी २ वाजता सफारीवर जाण्यासाठी तो प्रवेशद्वारावर आला, तेव्हाच लोकांना त्याला पाहता आलं.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या स्वागतानंतर सचिन जिप्सीतून सफारीवर निघाला. पुढचे दोन दिवस सचिनचा ताडोबामध्ये मुक्काम असणार आहे. सचिनला याचि देही याचि डोळा पाहायची संधी आता ताडोबातल्या वाघांना मिळणार आहे.