धक्कादायक! खेळताना दुधाच्या कढईत पडल्याने अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीगरमध्ये दुधाच्या कढईत पढून एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ही दुर्दैवी घटना घडली आहे. गंभीररित्या भाजलेल्या चिमुकल्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.

आकाश नेटके | Updated: Sep 8, 2023, 09:43 AM IST
धक्कादायक! खेळताना दुधाच्या कढईत पडल्याने अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : हिंगोलीत झोका खेळत असताना सहावीत शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये दुधाच्या कढईत पडून अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. घरात खेळताना दुधाच्या (Milk) कढईत पडल्याने चिमुकला जखमी झाला होता. दोन दिवसांपासून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. अखेर गुरुवारी जखमी चिमुकल्याची प्राणज्योत मालवली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठणच्या संजरपुरा भागात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. या बाळाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहम्मद जियान मोहम्मद इरफान असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.

मोहम्मद जियान मोहम्मद इरफान हा मालेगाववरुन आईसह मामाच्या घरी आला होता. दोन दिवसांपूर्वी मोहम्मद जियान मोहम्मद इरफान हा घरात खेळताना गरम दुधाच्या कढईत पडला. कढईत पढल्याने जियान गंभीररित्या भाजला होता. त्याच्यावर दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पैठण पोलीस ठाण्यात याप्रकरणाची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पैठण शहरातील नेहरू चौक संजरपुरा येथील रहिवासी बब्बु शमी यांची मुलगी मालेगाव येथे मोहम्मद जियान यांच्या सोबत आला होता. सोमवारी सकाळी अब्बु कटयारे यांचा नातू मोहम्मद जियान खेळत असताना तो गरम करण्यासाठी ठेवलेल्या दुधाच्या कढईमध्ये पडला. यामध्ये तो गंभीररित्या भाजला गेला होता. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या

छत्रपती संभाजीगर शहरातील नामांकित हॉटेल मध्ये प्रेमी युगुलाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऋषिकेश आणि दिपाली असे या प्रेमीयुगूलाचे नाव आहे. संभाजीनगर शहराजवळच असलेल्या बिडकीन गावात हे दोघेही एकाच गल्लीत राहत होते. तिथून त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते. मात्र त्यांच्या लग्नाला विरोध असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे ते शहरात आले होते आणि त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये रूम घेतली आणि तिथे गळफास घेतला. सकाळी रूमचा दरवाजा उघडत नसल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी येऊन दरवाजा उघडल्यावर गळफास घेतल्याचे चित्र पाहायला मिळालं.