जुन्नर : शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 101-शिवबा सलामीच्या कार्यक्रमातून अनोख्या पद्धतीने यांचं स्वागत होणार आहे. आदिवासी भागातील तेजुरच्या ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील 51 मुली व तेजुर येथील ग्रामस्थांच्या ढोल ताशा पथकातील 50 माजी विद्यार्थी असे आजी माजी आदिवासी विद्यार्थी 7 मिनिटांचा एक कार्यक्रम सादर करणार आहेत.
या शाळेस सादरीकरणाची पाचव्यांदा संधी मिळाली आहे. 50 ढोल ताशे व 51 मुलींचे भगव्या झेंड्यांचे रोमहर्षक संचलन आदिवासी डांगी नृत्यातून सादर करणार आहेत. यासाठी सध्या जोरदार सराव सुरू आहे.
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर हा शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा पारंपरिक दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहे. यावेळी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी हजारो शिवप्रेमी शिवनेरीवर येतात.
शिवजन्मस्थळ येथे पाळणा हलवून पारंपरिक पद्धतीने शिवजन्म सोहळा साजरा केला जातो. यावेळी विविध कायक्रमांचं आयोजन येथे केलं जातं.