close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

 मेट्रोच्या कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

Updated: Sep 17, 2019, 10:35 PM IST
रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

रत्नागिरी : आरेवरुन कारे करणाऱ्या आणि नाणारचं जे झालं तेच आरेचंदेखील होईल, असं म्हणत मेट्रोच्या कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असं म्हणत होतो, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उल्लेख न करता शिवसेनेला इशारा दिला आहे. 

महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं रत्नागिरीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारवर भाष्य केलं. 'नाणार रिफायनरी संदर्भात पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. रिफायनरीमुळे कोकणात १ लाख रोजगार उपलब्ध होतील. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असं घसा फोडून सांगत होतो. 

मात्र आता तुमचा उत्साह पाहून समाधान वाटतं,' असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेदरम्यान काहींनी 'आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवाय', असा मजूकर लिहिलेले फलक दाखवले. याच फलकांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरीबद्दल पुन्हा चर्चा होऊ शकते, असं विधान केलं.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करताना शिवसेनेनं नाणारचा मुद्दा लावून धरला होता. शिवसेनेनं नाणारच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता. त्यामुळेच हा प्रकल्प नाणारमधून रद्द करण्याची घोषणा भाजपाकडून करण्यात आली. 

आता विधानसभेच्या निवडणुकीआधी आरेतील मेट्रोच्या कारशेडचा मुद्दा तापला आहे. शिवसेनेनं मेट्रो कारशेडविरोधात दंड थोपटले आहेत. नाणारचं जे झालं, तेच आरेचं होणार, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारशेडविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी थेट नाणार प्रकल्पाला गती देण्याचा मानस व्यक्त केल्यानं शिवसेना-भाजपामधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.