30 वर्षांनंतर महाविद्यालयात पुन्हा निवडणुका? यावेळची सर्वात मोठी अपडेट!

College Elections: गुन्हेगारी वर्तन वाढीस लागल्याचे कारण दर्शवित 1994 पासून महाविद्यालयीन निवडणुकाच बंद करण्याचे धोरण तत्कालीन राज्य शासनाने स्वीकारले होते. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 29, 2025, 02:00 PM IST
30 वर्षांनंतर महाविद्यालयात पुन्हा निवडणुका? यावेळची सर्वात मोठी अपडेट! title=
महाविद्यालयीन निवडणूका

College Elections: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालय निवडणुका सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करणार असल्याचे सांगत लवकरच खुल्या पद्धतीने महाविद्यालयात निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहे. भांडण तंट्यांमुळे 30 वर्षांपासून बंद असलेल्या छात्रसंघाच्या या निवडणुकांचा गुलाल आता पुन्हा उधळल्या जाणार का? याकडे विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागले आहे.

गुन्हेगारी वर्तन वाढीस लागल्याचे कारण दर्शवित 1994 पासून महाविद्यालयीन निवडणुकाच बंद करण्याचे धोरण तत्कालीन राज्य शासनाने स्वीकारले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारीत विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्याची पद्धत सध्या सुरू आहे. मात्र या पद्धतीमुळे चांगले नेतृत्व मिळत नसल्याची ओरड आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याबाबत आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढेच जाहीररित्या ह्या निवडणूका सुरू करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही महाविद्यालयांत निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सकारात्मकता दाखवली. यानंतर विद्यार्थीवर्गात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजप विचारधारेच्या अभाविप सह काँग्रेसच्या एनएसयुआय ने देखील महाविद्यालयात सिलेक्शन पद्धती ऐवजी इलेक्शन पद्धतीने छात्रसंघ अध्यक्ष निवडावा अशी मागणी केली आहे.

देश आणि राज्यातील सध्याचे सर्वपक्षीय शीर्ष नेतृत्व हे विद्यार्थी दशेत महाविद्यालयीन निवडणुकांमधूनच घडले आहे, या निवडणुकांमधूनच राजकीय पक्षांना कार्यकर्ते, नेते मिळालेले आहे. मात्र निवडणूका बंद झाल्यापासून तरुण कार्यकर्त्यांची संख्या रोडावली, विद्यार्थी संघटना देखील लयास गेल्या, विद्यार्थी हिताची आंदोलने बंद झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले की आमचं नेतृत्व कॉलेज निवडणूकांमधून तयार झालेलं आहे, नेता तयार करण्याचं केंद्र कॉलेज निवडणूका आहे. 

सध्या देशात आणि राज्यात राष्ट्रवादी विचाराचे सरकार असले तरी अराजकतावादी मंडळी वायुरूपी युवा प्रदूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे, माओवादी नक्षलवादी विचार आता शहरात, कॉलेज कॅम्पस मध्ये नेऊन संविधान आणि राष्ट्रीय संस्थानविरुद्ध बंड पुकारण्याचे प्रयत्न सुरू आहे. अराजकतावादी ताकतींनी उभे केलेले विचारांचे प्रदूषण नष्ट करून राष्ट्रवादाचे बीजारोपण करण्याचे आव्हान असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी छात्रसंघ निवडणुकाबाबत सकारात्मकता दर्शविली. 

महाविद्यालयात खुल्या निवडणुका घेतल्यामुळे  लोकशाही प्रक्रिया खऱ्या अर्थाने राबवली जाईल, असा आशावाद तर आहेच शिवाय  शिक्षणाच्या क्षेत्रात शैक्षणिक मुद्यांवर आधारीत आणि नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निकोप वातावरणात विद्यापीठ कायद्यानुसार निवडणुका होण्याची गरज देखील व्यक्त होत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x