आश्चर्यकारक! लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाले !

सरोवरातील पाण्याचा रंग का बदलला?

Updated: Jun 10, 2020, 09:36 PM IST
आश्चर्यकारक! लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाले !

मयुर निकम, बुलढाणा :   जगातल्या आश्चर्यांपैकी एक असलेल्या बुलढाणाच्या लोणार सरोवरात एक आश्चर्यकारण बदल घडला आहे. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात लोणार सरोवराकडे कुणी फिरकलं नाही. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर तेथे गेलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण लोणार सरोवरातील पाणी चक्क गुलाबी लाल रंगाचे झाल्याचे लक्षात आले आहे. हा नैसर्गिक चमत्कार नेमका काय आहे याबाबत आता अभ्यास केला जाणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर उल्कापाताने निर्माण झालेलं बेसाल्ट खडकाचे आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे. या सरोवरात असलेले पाणी मूळात क्षारयुक्त, खारे असले तरी सरोवरात क्षारयुक्त पाणी आणि गोड पाणी असे दोन प्रवाह आहेत. हीच या सरोवराची वैशिष्ट्ये आहेत. पण या सरोवरातील पाणी गुलाबी, लाल का झाले याबाबत उत्सुकता आहे.

लोणार सरोवरातील पाण्याचा रंग का बदलला?

लोणार सरोवरातील पाण्याचा रंग लाल-गुलाबी का झाला याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या पाण्यात रासायनिक द्रव्य आहे. त्याची क्षारता आधी १४ होती. ती आता ९.५ च्या आसपास आहे. झरे आटलेत, पाऊस कमी पडला, सरोवरातील पाणी कमी होत आहे. उन्हाळ्यात या परिसरातील झरे आटल्याने गोड्या पाण्याचे स्त्रोत आटले असावेत आणि क्षारयुक्त पाणी वाढल्याने पाण्याचा रंग बदलत असावा, असे मत अभ्यासक प्रा. सुधाकर बुगदाणे यांनी व्यक्त केले आहे.

लोणार सरोवराप्रमाणे इराणमधील उमरिया सरोवरामध्येही असेच पाणी आहे. प्रदूषणामुळे पाण्यात क्षारता कमी असल्याने असे होते आणि उमरिया सरोवरात सुद्धा पाण्याचा रंग गुलाबी आहे, असं अभ्यासक प्रा. गजानन खरात सांगतात. लोणार सरोवरातील पाणी मागच्या १० वर्षांपेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे सरोवरातील पाण्याच्या क्षारतेवर परिणाम झाला असावा आणि त्यामुळेच पाण्याचा रंगही बदलला असावा, असे प्रा. गजानन खरात यांना वाटते. पण त्यासाठी संशोधन करण्याची गरज आहे, असं ते सांगतात.

प्रशासकीय यंत्रणेलाही लोणार सरोवराच्या पाण्याच्या रंगात झालेला बदल आश्चर्यकारक वाटतो. याबाबत वनविभागाला कळवलं आहे, अशी माहिती तहसीलदार सैफन नदाफ यांनी दिली.

लोणार सरोवरातील पाणी लाल-गुलाबी होण्याबाबत स्थानिकांचा वेगळाच कयास आहे. लोणार सरोवरात शहरातील घाण पाणी जाते. त्यामुळे सरोवरात प्रदूषण होत आहे. प्रदुषणामुळेच लोणार सरोवराचे पाणी गढूळ दिसत आहे, ते लाल रंगाचे नाही, असा त्यांचा दावा आहे. शहरातील घाण आणि सांडपाणी सरोवरात जाऊ नये म्हणून शासनाने निरीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभा केला. पण तो बंदच आहे. त्यामुळे प्रदुषण वाढल्यानेच हा प्रकार घडला असावा, असे मत लोणार सरोवर विकास व जतन समितीचे सदस्य प्रा. बळीराम मापारी यांनी व्यक्त केले.

अभ्यासकांची मतं वेगवेगळी असली तरी लोणार सरोवराचे पाणी आजवर कधीही गुलाबी झाले नव्हते. जगप्रसिद्ध लोणार समुद्राच्या पाण्यात झालेला हा बदल आश्चर्यकारक असून त्याचा शोध घेण्याची गरज आहे.