काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद, भाजपवर कट कारस्थानचा आरोप

 पश्चिम मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. 

Updated: Oct 10, 2019, 02:50 PM IST
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद, भाजपवर कट कारस्थानचा आरोप title=

औरंगाबाद : पश्चिम मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. यामागे भाजपच्या लोकांचे कट कारस्थान असल्याचा आरोप अर्ज बाद झालेले काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

निवडणूक अधिकाऱ्ंयासोबत संगनमत करून जाणीवपूर्वक अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. या मतदारसंघात शिवेसेनेचे आमदार संजय शिरसाठ निवडणूक रिंगणात आहेत. मात्र भाजपच्या राजू शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिंदे हे विधानसभा अध्यक्ष बागडे यांचे निकटवर्तीय आहेत. म्हणून बागडेंनीच हा घात केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

दरम्यान, औरंगाबादेमध्ये शिवसेना एमआयएम दोन्ही पक्ष जातीय राजकारण रंगवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने शिवेसनेचा पराभव करत विजय मिळवला. हा पराभव शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांना जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभवाची परतफेड करण्याची शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. त्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा दंगलीवरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.  

काही दिवसांपूर्वी औवेसी यांच्या सभेतूनही असाच राग आळवत शिवसेनेविरोधात वंचितांनी एकत्र येण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे औरंगाबादेत निवडणुका जातीय समीकरणांवर लढल्या जाणार हे स्पष्ट होत आहे.