लातूरच्या भाजप उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

कामगारमंत्री संभाजी पाटील यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी

Updated: Apr 19, 2019, 06:15 PM IST
लातूरच्या भाजप उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी title=

लातूर : लातूर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे मतदानाच्या दिवशी प्रचार करत असल्याचा आरोप करत सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर कामगारमंत्री संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे.

लातूर मतदारसंघात मतदान सुरु असताना भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी रद्द करावी आणि संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे एका मतदान केंद्राबाहेर मोबाईलच्या स्पीकर फोनवरून राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी बोलताना पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याने मतदार मतदान करत नाहीत असे सांगितले. तेव्हा संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांशी बोलून पीकविम्याचे पैसे देतो असे आश्वासन दिले. मतदान सुरु असताना अशा पद्धतीने मतदारांना प्रलोभन देणे हा आचारसंहिता भंगाचा प्रकार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने संभाजी पाटील निलंगेकर व उमेदवार सुधाकर शृगांरे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली.

>