मुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी निवडणूक होणार, विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार जाहीर

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केला आहे.

Updated: May 9, 2020, 09:21 PM IST
मुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी निवडणूक होणार,  विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार जाहीर title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. याआधी काहीच वेळापूर्वी काँग्रेसने प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश राठोड यांना उमेदवारी दिली होती. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरवर दोन्ही उमेदवारांबाबत माहिती दिली आहे, तसंच दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला आहे. विधानपरिषदेसाठी काँग्रेसने दोन्ही उमेदवार मराठवाड्यातीलच दिले आहेत. 

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी भाजपने आधीच ४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या चारही उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले आहेत. 

दुसरीकडे शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेने ही दोन्ही नावं निश्चित केली असली, तरी त्यांची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचा चर्चा आहेत. महाविकासआघाडीचे सगळे उमेदवार सोमवारी त्यांचा अर्ज दाखल करणार आहेत.

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी भाजपचे ४ तर काँग्रेसचे २ उमेदवार निश्चित झाले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनही प्रत्येकी २-२ उमेदवार देणार आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, तर विधानपरिषद निवडणूक अटळ आहे. १४ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, तर २१ मे रोजी विधानपरिषदेसाठी निवडणूक होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार करण्यासाठी विधानपरिषदेची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.