अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवेंचा एकाच विमानातून प्रवास; भाजप प्रवेशाची दाट शक्यता

सत्तार आणि दानवे यांच्या भेटीने राजकीय चर्चेला ऊत

Updated: Apr 4, 2019, 11:54 AM IST
अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवेंचा एकाच विमानातून प्रवास; भाजप प्रवेशाची दाट शक्यता title=

मुंबई: मराठवाड्यातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या सत्तार यांनी बंड केले होते. अखेर बुधवारी त्यांनी औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले. तत्पूर्वी औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावरील व्हीआयपी कक्षात त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यानंतर हे दोन्ही नेते एकाच विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यामुळे अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

मुंबईत आल्यानंतर सत्तार आणि दानवे एकत्रच मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. याठिकाणीही त्यांच्यात तासभर चर्चा झाली. मात्र, या भेटीचा नेमका तपशील अजून उघड होऊ शकलेला नाही. तत्पूर्वी बुधवारी पत्रकारांसोबत बोलताना सत्तार यांनी आता काँग्रेसला दाखवून देण्याची भाषा केली होती. सत्तार भाजपमध्ये गेल्यास मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद किंवा जालन्यातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसने झांबड यांना उमेदवारी देऊ केल्यामुळे सत्तार नाराज झाले. हा निर्णय घेताना पक्षाने आपल्याला विश्वासात घेतले नाही. परिणामी मी अपक्ष लढणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले होते.

गेल्या २० वर्षांपासून अब्दुल सत्तार हे आमदार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील काँग्रेस पक्ष आणि स्थानिक राजकारणात सत्तार यांचे चांगलेच वजन आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीतही मोदी लाट असूनही अब्दुल सत्तार निवडून आले होते. तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधील काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल साडेतीन लाख मते मिळाली होती. यावेळी अब्दुल सत्तार यांनीच काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.