यवतमाळ : उन्हाळ्यात कुलर अनेक घरात वापरला जातो. पण हा कूलर वापरत असताना काळजी घेतली नाही तर अनर्थ होऊ शकतो. कारण यवतमाळमध्ये कुलर साफ करताना विजेचा शॉक लागून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. अशा दुर्घटना का घडतात? अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
कुलरनं घेतला चिमुकल्याचा जीव
संकल्प ढवळे या अवघ्या ११ वर्षांच्या मुलाचा करूण अंत झालाय. यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील सावर येथे ही दुर्घटना घडली. घरात सुरू असलेल्या कुलरची सफाई सुरू होती. कूलरमध्ये अडकलेला कचरा काढून तो छिद्रांमध्ये साफसफाई करत होता. त्याचवेळी विजेचा जोरदार शॉक त्याला लागला. शेजारीच असलेल्या आजोबांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी लागलीच कुलर बंद केला. पण तोपर्यंत संकल्पचा बळी गेला होता.
चंद्रपुरात काही दिवसांपूर्वीच कुलरचा शॉक (Cooler Shock) लागून एका 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. खेळत असताना कुलरच्या स्टँडला हात लागल्याने चिमुकल्याचा जीव गेला. कूलरच्या स्टँडमध्ये करंट उतरलं होतं.
कूलरचा शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटना नवीन नाही. या आधी देखील अशा घटना घडल्या आहेत. पण यापासून धडा घेण्याची गरज आहे. अन्यथा वेळ निघून गेल्यावर काहीही हातात राहत नाही.
यंदाच्या वर्षी कडक उन्हाळ्याच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. विदर्भात तर पारा ४४ आणि ४५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळं एसी आणि कूलर वापराचं प्रमाणही वाढलं आहे. अशावेळी कूलर वापरताना काय काळजी घ्यावी?
ओल्या हातानं कुलर सुरू करू नये
पंपातून पाणी येत नसेल तर वीज प्रवाह बंद करावा
पंप आणि वायर पाण्यात बुडली नसल्याची खात्री करावी
पंपाचे अर्थिंग योग्य असल्याचं तपासून घ्यावं
दुर्दैवानं कुलर हाच संकल्प ढवळेचा किलर ठरला. पण तुमच्या घरातला कुलर किलर होऊ नये, असं वाटत असेल तर योग्य खबरदारी घ्या.