साउथ इंडियाची स्पेशालिटी असलेला सांबार खरं तर मराठमोळा पदार्थ; छत्रपती संभाजी महाराजांसोबत कनेक्शन?

South Indian Food: सांबार हा पदार्थ कुठून उदयास आला माहितीये का? या मागेदेखील महाराष्ट्राचे कनेक्शन आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 19, 2024, 12:35 PM IST
साउथ इंडियाची स्पेशालिटी असलेला सांबार खरं तर मराठमोळा पदार्थ; छत्रपती संभाजी महाराजांसोबत कनेक्शन? title=
South Indian Food The story of popular South Indian Sambar was invented

South Indian Food: दक्षिण भारतात केले जाणारे सांबार आता जगभरात प्रसिद्ध आहे. आंबट-तिखट चवीचे सांबार मेदुवडा, इडलीसोबत फारच चविष्ट लागते. डाळीत टोमॅटो, गाजर, भोपळा भाज्या आणि सांबार स्पेशल मसाला ही चव जिभेवर रेंगाळत राहते. पण तुम्हाला माहितीये साउथ इंडियान स्पेशालिटी म्हणून जगभरात लोकप्रिय झालेला सांबार हा शब्द नेमका कसा तयार झाला. सांबाराचं महाराष्ट्रासोबत खास कनेक्शन आहे. 

भारतातील विविधता हा अनेकदा जगभरासाठी कुतुहलाचा विषय ठरतो. भारतातील प्रत्येक राज्यातील जेवण हे खूपच स्पेशल असते. त्या त्या राज्याची खाद्यपदार्थाबाबत एक स्पेशालिटी असते. महाराष्ट्राची झुणका-भाकर असेल किंवा दक्षिणेकडील इडली-सांबार असेल ते पदार्थ त्या राज्यातील हवामान किंवा इतिहासाप्रमाणे अधिक लोकप्रिय असतात. भारतातील खाद्यपदार्थांमागेदेखील इतिहास आहे. आज आपण सांबार आणि संभाजी महाराज यांच्यातील कनेक्शन काय होतं, जाणून घेऊया. 

असं म्हणतात की, दक्षिण भारतात लोकप्रिय असलेला सांबार हा पदार्थ सर्वात पहिले तंजावरच्या मराठा राजघराण्यातील स्वयंपाकघरात केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी तंजावरवर राज्य करत होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र पहिले शाहुजी सत्तेवर आले ते उत्तम स्वयंपाकी होतं असंही म्हटलं जातं. शहाजींच्या कारकिर्दीतच पहिल्यांदा सांबार बनवण्यात आल्याचे संदर्भ आढळतात. या विषयी एक अख्यायिकादेखील सापडते. 

छत्रपती संभाजी महाराज एकदा तंजावरच्या दौऱ्यावर असताना त्यांना त्यांचे चुलत बंधु शहाजीराजे यांनी मेजवानीसाठी बोलवले. मात्र, त्याचवेळी स्वयंपाकघरातील कोकम संपल्याने आमटीत चिंच व भाज्या वापरण्यात आली. आमटीतील हा बदल अनेकांना आवडला. तसंच, संभाजी महाराजांसाठी हा खास आहार करण्यात आला होता. तेव्हा त्याला संभाजी+ आहार अशा अर्थाने सांबार असं नाव देण्यात आले. 

प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी एका कार्यक्रमात सांबाराबाबत माहिती देताना म्हटलं होतं की, आज भारतात तूरडाळ वापरुन सांभार बनवण्यात येतो. मात्र पहिल्यांदा मराठ्यांच्या राजवटीत सांभार बनवण्यात आला तेव्हा त्यात उडदाची डाळ वापरण्यात आली होती, असं कुणाल कपूर याने म्हटलं होतं. दक्षिण भारतीय म्हणून मिटक्या मारुन खात असलेला हा पदार्थ खरं तर मराठमोळाच आहे, असं म्हणायला हरकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरुनच या पदार्थाला सांभार असं नाव मिळालं.