कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : कोरोना म्हणजे महासंकट असल्यासारखं वागू नका. कोरोना बरा होतो हे पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ येत आहे. कारण कोरोनाच्या धसक्यामुळे आता काही जण भलते सलते प्रकार करु लागले आहेत. पुण्यातले काही लोक कोरोनासंदर्भात आततायीपणा करत असल्याचं समोर आलं आहे.
पिंपरी चिंचवडचं डेक्कन म्हणून ओळखली जाणारी पिंपळे सौदागर ही उच्च्भ्रू वसाहती आहे. याच सोसायटीतल्या नागरिकांनी कोरोनासंदर्भात विचित्रपणा केलाय. या सोसायटीमधलं एक कुटुंब मलेशियाला पर्यटनासाठी गेलं आहे. रविवारी हे कुटुंब परतणार आहेत. पण त्यांना कोरोना ची लागण झाली असेल, या भीतीने सोसायटीतल्या लोकांनी चक्क पोलीस स्टेशन गाठलं आणि या कुटुंबाला सोसायटीच येऊ देऊ नका, अशी मागणी केली.
या घटनेचा पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशननेही निषेध केलाय. पण पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांनीही परत येताना पूर्ण तपासणी करूनच सोसायटीमध्ये प्रवेश करावा असं आवाहन केलं आहे.
मुळात परदेशात गेलेल्या नागरिकांची विमानतळावरच तपासणी केली जातेय. त्यामुळे उगाचच घाबरु नका. कोरोना बरा होणारा रोग आहे, राक्षस नाही.