पुणे : कोरोनाच्या तिसर्या लाटेमुळे लहान मुलांमध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही बालरोग तज्ञांशी चर्चा करून मुलांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिसर्या लाटेपूर्वी पुण्यातील लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण आढळले आहे. गेल्या वर्षाची आकडेवारी पाहिली असता पुण्यात अडीच लाख मुलांची कोरोना टेस्ट केली गेली, यापैकी 1 वर्षाखालील 249 मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने विशेषतः लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
दुसऱ्या आणि तिसर्या लाटेमुळे लहान मुले, तरुण आणि गर्भवती महिलांमध्ये कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे लक्षात घेता राज्यातील बालरोग तज्ञांची टास्क फोर्स लवकरच काम सुरू करेल.
रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविणे, मुलांसाठी व्हेंटिलेटर वाढविणे, आयसीयू बेड पुरेसे तयार ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. या निर्देशानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बाल कोविड केंद्रे बांधली जात आहेत.
पुण्यात तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन महापालिका अलर्ट मोडवर काम करत आहे. पुण्यात देशातील पहिले बाल कोव्हिड केअर रुग्णालय बांधले जात आहे. येरवडाच्या राजीव गांधी रुग्णालयात हे बाल कोविड केअर रुग्णालय तयार केले जात आहे. येथे 200 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जात आहे.
या रुग्णालयासाठी 4 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार हे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होईल.
पुण्याप्रमाणेच औरंगाबाद नगरपालिकेकडून कोव्हिड हॉस्पिटलही लहान मुलांसाठी तयार केले जात आहे. औरंगाबादच्या एमजीएम कॅम्पसमध्ये 100 बेड्सचे कोविड चिल्ड्रन्स हॉस्पिटल बांधले जाणार आहे.
लहान मुलांसह गर्भवती महिलांसाठी देखील 50 बेड्सचे रुग्णालय तयार केले जात आहे. या रुग्णालयाचे काम येत्या दहा ते पंधरा दिवसांत काम सुरू होईल. म्हणजेच कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी औरंगाबाद पालिकेने पूर्ण तयारी केली आहे.