मुंबई : देशभरात कोरोनाचा तीव्र गतीने प्रसार होत आहे. कोरोनाचा विषाणू आपलं रुप बदलवत असल्याचं आतापर्यंत अनेक तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. देशातील 10 कोरोना प्रभावित राज्यांमध्ये डबल म्युटंट स्ट्रेन आढळून आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
देशात मार्चच्या मध्यापासून कोरोना संसर्गाचा अचानक उद्रेक पाहायला मिळाला. आता अनेक राज्यांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती बनली आहे. त्याचं कारण कोरोनाचा नवीन स्ट्रेन आहे. नव्या स्ट्रेनचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील उच्च सूत्रांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा तीव्र प्रसाराचे कारण डबल म्युटेशन असण्याची शक्यता आहे. डबल म्युटंट विषाणू वाऱ्याच्या वेगाने देशात पसरत आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये डबल म्युटंट स्ट्रेन दिसून येत आहे. कोरोनाचा तीव्र गतीने प्रसार होण्यास डबल म्युटंट स्ट्रेन कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन वेगवेगळ्या स्ट्रेनचे विषाणू मिळून तिसरा विषाणू तयार झाल्यास त्याला डबल म्युटंट स्ट्रेन असं म्हणतात. देशात UK, अमेरिका आदी कोरोना विषाणूचे स्ट्रेन आढळून आले आहेत.