दीड महिन्यानंतर लालपरी सामान्य प्रवाशांसाठी धावली

महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी गेले दीड महिना कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प आहे.

Updated: May 4, 2020, 10:03 PM IST
दीड महिन्यानंतर लालपरी सामान्य प्रवाशांसाठी धावली title=

आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली : महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी गेले दीड महिना कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प आहे. ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांत एसटी सेवा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असली तरी आज केवळ एकाच जिल्ह्यात एसटी सेवा सुरु झाली. ती देखिल महाराष्ट्राचं दुसरं टोक असलेल्या गडचिरोलीमध्ये.

गाव तिथे एसटी असं ब्रिद असलेली राज्य परिवहन महामंडळाची बससेवा म्हणजे एसटी सर्वसामान्यांच्या प्रवासातील महत्वाची सेवा. कोरोना लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता खाजगी वाहतूकही बंद आहे. ती सुरु करण्याची परवानही अद्याप सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील वाहतूक ठप्पच आहे. पण लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु करताना सरकारने ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांतील एसटी वाहतूक सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

सध्या राज्यात चार जिल्हेच ग्रीन झोनमध्ये आहेत. त्यात विदर्भातील वाशिम, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. सरकारने परवानगी दिली असली तरी जिल्ह्यात एसटी सुरु करायची की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.

आजपासून एसटी सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी केवळ गडचिरोली जिल्ह्यातच एसटीची वाहतूक सुरु झाली आहे. ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यात कोरोना उपाययोजनांसाठी केलेले नियम पाळून एसटी वाहतूक सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र गडचिरोली वगळता अन्य जिल्ह्यांत मात्र एसटी सुरु करण्यात आलेली नाही. पण गडचिरोली जिल्ह्यात एसटी सुरु झाल्याने जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मिरचीतोड कामगारांना एसटी सुरु झाल्याचा फायदा झाला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यांत एसटी वाहतूक सुरु होणार असून ती जिल्ह्याअंतर्गतच सुरु करण्यात येणार आहे. आंतरजिल्हा वाहतूक मात्र बंदच राहणार आहे. सर्व जिल्ह्यांच्या सीमा अद्यापही सील करण्यात आलेल्या असून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातही अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कुणालाही जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही.