T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मधल्या सेमीफायनलला आता काही तासांचाच अवधी उरला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा (Team India) सामना बलाढ्य इंग्लंडशी रंगणार आहे. 27 जूनला गयानात हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) एक वाईट बातमी समोर आली आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये नंबर वनचा ताज सूर्यकुमार कडून हिसकावला गेलाय. सूर्यकुमार यादवच्या जागी ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड टी20 क्रिकेटचा नंबर वन फलंदाज बनला आहे. सूर्यकुमारची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
आयसीसी टी20 क्रमवारीत उलटफेर
आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर (ICC T20 Ranking) केली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रेव्हिस हेड अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ट्रेव्हिस हेडच्या खात्यात 844 पॉईट जमा झालेत. त्याने 4 स्थानांची झेप घेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. ट्रेव्हिस हेडने भारताविरुद्ध 6 धावांची खेळी केली होती. यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत हेडने 255 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवनेही या स्पर्धेत दोन अर्धशतकं झळकावली. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला 31 धावा करता आल्या. तर बांगलादेशिविरुद्धच्या सामन्यात तो केवळ 6 धावा करुन बाद झाला. याचा फटका त्याला क्रमवारीत बसला. आयसीसी क्रमवारीत त्याची दुसऱ्या स्थानाने घसरण झाली.
सूर्यकुमार यादव पुन्हा नंबर वन?
सूर्यकुमार यादवकडे टी20 क्रिकेटमध्ये पुन्हा नंबर वन बनण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादवला टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये खेळायचं आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला तर अंतिम सामन्यातही खेळण्याची संधी मिळणार आहे. या दोन्ही सामन्यात सूर्यकुमार यादवने मोठ्या खेळी केल्या तर तो टी20 क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचू शकतो. टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्याची कामगिरी चांगली आहे.
इंग्लंडविरुद्ध सूर्यकुमारने 45 हून जास्त अॅव्हरेजने 274 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचाही समावेश आहे. सूर्याचा स्ट्राईक रेट 190 इतका आहे. त्यामुळे ट्रेव्हिस हेडचा नंबर वनचा आनंद फार काळ टिकणार नाही हे निश्चित.
टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज