धक्कादायक! महाडमध्‍ये नदीपात्रात सापडले वापरलेले...; नागरीकांमध्‍ये भीतीचं वातावरण

रायगडच्‍या महाड औद्योगिक वसाहतीत एक धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Jun 16, 2022, 10:51 AM IST
धक्कादायक! महाडमध्‍ये नदीपात्रात सापडले वापरलेले...; नागरीकांमध्‍ये भीतीचं वातावरण title=

प्रफुल्‍ल पवार, महाड : रायगडच्‍या महाड औद्योगिक वसाहतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. औद्योगिक वसाहतीच्या नदीपात्रात वापरलेले कोरोना चाचणी कीट आढळून आले आहे. हे वापरलेले कीट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्‍थानिक नागरीकांकडून आता करण्यात येतेय.

महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदुषणाची समस्‍या नेहमीच चर्चेत आहे.  कधी सांडपाणी लिकेज, कधी नदीपात्रात हिरवं, काळं, लाल पाणी वाहणं या समस्येमुळे नागरीक हैराण आहे. अशाच परिस्थितीत इथल्‍या नदीपात्रात चक्‍क वापरलेले कोरोना चाचणी कीटस आढळून आलेत. त्‍यामुळे नागरीकांमध्‍ये संतापाचं सोबतच भीतीचं वातावरण आहे.

कोरोनाचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागला असून कोरोनाची चौथी लाट येण्‍याची भीती वर्तवली जातेय. अशातच वापरलेले कोरोना कीट्स आढळून आल्‍याने लोक भयभीत झालेत. आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

दरम्‍यान बिरवाडी प्राथमिक आरोग्‍य केंद्र, एमआयडीसी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्‍या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केलीये. शिवाय याचे नमुने तपासणीसाठी घेण्‍यात आले आहेत.

 

ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ संदीप देशमुख यांच्या सांगण्यानुसार, महाड एमआयडीसीतील प्रदुषणाने आम्‍ही त्रस्‍त आहोत. त्यात आता कोरोना चाचणी कीट्स सापडलेत. प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्‍या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्‍हा दाखल करावा अशी मागणी आम्‍ही करणार आहोत. 

या परीसरात जे बायोमेडीकल वेस्‍ट सापडले आहे त्‍याचे नमुने घेण्‍यात आले आहेत त्‍याची तपासणी करण्‍यात येईल यात जे दोषी आढळतील त्‍यांचंयावर कारवाई करण्‍यात येईल असे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, संदीप सोनावणे यांनी सांगितलंय.