Mumbai Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला चार दिवस होऊन गेले. या दुर्घटनेत 16 निष्पाप मुंबईकरांनी आपले प्राण गमावले. बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. या 16 नागरिकांमध्ये मुंबई एअरपोर्टच्या एका अधिकाऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचा दुर्दैवी अंत झाला आहे. आपल्या माता-पित्याचा फोन का लागत नाही या काळजीत त्यांचा मुलगा अमेरिकेत होता. मात्र येथे त्याच्या आई-वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
आई-वडिलांचा फोन का लागत नाही. या काळजीत मुलगा होता. अमेरिकेत बसलेल्या मुलांचा आई-वडिलांचा संपर्क होत नसल्यामुळे अखेर त्यांनी मोबाईल ट्रॅक केला होता. तेव्हा त्यांचा फोन घाटकोपरच्या दुर्घटनास्थळी असल्याचे दिसून आलं. हे समोर येताच अमेरिकेत बसलेल्या मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली.
मुंबई विमानतळावर ट्राफिक कंट्रोलचे जनरल मॅनजर 60 वर्षीय मनोज चनसूर्या हे बेपत्ता होते. मनोज चनसूर्या मुंबईच्या विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोल जनरल मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा हा अमेरिकेत राहतो. सोमवारी संध्याकाळी अंधेरी पूर्व मरोळमधून मनोज चनसूर्या आपल्या मध्यप्रदेशमध्ये जबलपूर या ठिकाणी गावी जाण्यासाठी निघाले होते. आपली लाल कलरची टाटा हरिअर गाडी घेऊन स्वतः चालवत आपल्या पत्नीसोबत गावी जाण्यासाठी निघाले होते.
गावी जाताना त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी आपली गाडी घाटकोपरच्या पेट्रोल पंपवरती उभी केली होती. दरम्यान त्याचवेळी एक मोठं होर्डिंग या पेट्रोल पंपावर कोसळलं आणि ते आपल्या पत्नीसह या दुर्घटनेमध्ये होर्डिंग खाली दाबले गेले.आपले वडील फोन उचलत नाही म्हणून अमेरिकेत बसलेला मुलगा घाबरला आणि त्याने आपल्या मित्रांना मुंबईमध्ये संपर्क केला. मुंबईतल्या मित्रांनी अंधेरीच्या मरोळ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाईल ट्रॅक केला तेव्हा त्यांचं लोकेशन घाटकोपर चा पेट्रोल पंप दिसून आलं.
NDRF ने जेव्हा ढिगारा उपसला तेव्हा मनोज आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह बाहेर दिसला एनडीआरएफने ढिगाऱ्याखालून दोघा पती-पत्नींचा मृतदेह बाहेर काढला. मुलाला ही माहिती कळतात त्याच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
घाटकोपर येथं अजस्त्र असं होर्डिंग कोसळून 16 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत 91 लोक त्या अजस्त्र होर्डिंग खाली दबले गेले होते आणि गाड्यांचा चक्का चूर झाला होता. यानंतर युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. पण मोठा अडथळा होता पेट्रोल पंपचा. ज्वलनशील इंधन असल्यामुळे. बचाव कार्य करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागत होती. अखेर चार दिवसांनंतर रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले आहे.