कोविड-19 : आजपासून अनेक निर्बंध शिथिल; महाविद्यालय गजबजणार तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांना मोठी सूट

Covid-19 relaxations: महाविद्यालयांमध्ये दीड वर्षांनंतर आजपासून गजबज दिसून येणार आहे.  तर राज्यातील हॉटेल्स आता मध्यरात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहेत.  

Updated: Oct 20, 2021, 08:14 AM IST
कोविड-19 : आजपासून अनेक निर्बंध शिथिल; महाविद्यालय गजबजणार तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानांना मोठी सूट

मुंबई : Covid-19 relaxations: महाविद्यालयांमध्ये दीड वर्षांनंतर आजपासून गजबज दिसून येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. (college reopen ) मात्र कोरोना लसीच्या अटीमुळे उपस्थितीवर मर्यादा असणार आहेत. तर राज्यातील हॉटेल्स आता मध्यरात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहेत. राज्य शासनाने तसे आदेश जारी केले आहेत. इतर दुकाने रात्री 11 पर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Maharashtra : Now the restaurant will be open till 12 pm  while other All shops will be open till 11 pm)

कोविड-19च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून आता रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री 11पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविडसाठी लागू असलेली मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे परिस्थिती नुसार लागू राहील.

जवळपास दीड वर्षांनंतर आज राज्यातली कॉलेजेस सुरू होत आहेत. कॅम्पस, कॉलेजेस आज युवा विद्यार्थ्यांनी गजबजतील. अर्थात वर्गात 50 टक्के उपस्थितीचे बंधन आहे. कृषी महाविद्यालयंही आजपासून सुरू होणार आहेत. लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. कॉलेज सुरू होत असलं तरी विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेलं कॅण्टीन मात्र बंदच असेल. सर्व महाविद्यालयांनी वर्गांचं निर्जंतुकीकरण केले. सोशल डिस्टन्सिंग पाळता यावे म्हणून तशी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनातर्फे जारी एका पत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, पूर्वी लावलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसून फक्त रेस्टॉरंट, खाद्य पदार्थ पुरविणारे यांच्यासाठीच रात्री 12पर्यंत आपले आस्थापन चालू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर आस्थापना 11वाजेपर्यंत चालू राहतील. स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार निर्बंध लागू शकतात किंवा सवलत देऊ शकते असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.