वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव: अनेकांना मांजर-कुत्रे आवडत नाही. काहीवेळा त्यांच्यावर किंवा शेजारच्यांशी असलेल्या रागातून मुक्या प्राण्यांची हत्या केल्याच्या वेदनादायी घटना घडत असतात. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. मांजरीला बंदुकीची गोळी घालून माथेफिरून ठार केल्याची घटना समोर आली.
या मांजरीची चूक एवढीच होती की तिने कोंबडीचं पिल्लू खाल्लं होतं. या मांजरीला थेट गोळी घालून क्रूरपणे मारण्यात आलं. कोंबडीचं पिल्लू मांजरीनं गट्टम केल्याचा राग अनावर झाला. त्याच रागातून हेमराज सोनवणे नावाच्या माथेफिरूनं मांजरीची गोळी घालून हत्या केली.
या घटनेच्या पार्शवभूमीवर पोलिसांनी हेमराज सोनवणे याला ताब्यात घेतले असून शहरातील तालुका पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. - जळगाव शहरातील योजना नगर भागात हेमराज सोनवणे आणि पुष्कराज बानाईत हे दोन शेजारी राहतात.
हेमराज सोनवणे यांना कोंबड्या पाळण्याची आवड आहे तर बानायात यांना मांजरी पाळण्याची आवड आहे. गेल्या काही दिवसांपासून बानायात यांनी पाळलेल्या मांजरीचे हेमराज सोनवणे यांच्या कोंबड्यांची पिल्ले फस्त केल्याने हेमराज सोनवणे यांचा मांजरीवर राग होता.
हेमराज सोनावणे हे आपल्या घरच्या जवळ उभे असतानाच मांजरीने सोनवणे यांच्या कोंबडीचे पिलू मारल्याचे सोनवणे यांनी डोळ्याने पाहिले. याचा संताप आल्याने घरातील बंदूक काढून शेजारच्या घराजवळ बसलेल्या मांजराच्या पिलाला थेट गोळी घातली.
या घटनेमध्ये मांजरीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हेमराजला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.