प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया: संताप अनावर झालेल्या वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली आहे. या घटनेमुळे गोंदिया जिल्हा हादला आहे. धक्कादायक घटना तिरोडा तालुक्यातील लोणार इथे घडली आहे.
लोणार इथे संध्याकाळी दीड वर्षांच्या चिमुकलीनं आईकडे खाऊ घेण्यासाठी हट्ट केला. 5 रुपये खाऊसाठी या चिमुकलीला हवे होते. आईनं ही गोष्ट वडिलांना सांगितली. त्यांच्याकडे 5 रुपये सुट्टे नव्हते. 500 रुपयांची नोट 5 रुपयांसाठी मोडणार नाही.
मुलीला खाऊसाठी पैसे हवे होते. खाऊ घ्यायला पैसे न दिल्यानं मुलगी हट्ट करू लागली. वडिलांनी संतापाच्या भरात चिमुकलीला अंगणात नेऊन आपटलं. या घटनेत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळताच आईनं पोलीस ठाण्यात धाव घेतली.
5 रुपयांसाठी वडिलांनी आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव घेतल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संतापलेल्या वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता पोटच्या मुलीची क्रूरपणे हत्या केली.
आईला या प्रकरणाची माहिती मिळताच तिने न्यायासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मृत मुलीच्या आईनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.