बॅंकेचे संगणक सुरु करताच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला! तब्बल 'इतके' कोटी रातोरात झाले गायब

बॅंकेतील कर्मचारी बॅंकेत आल्यावर त्यांना येस बॅंकेच्या खात्यावर सायबर हल्ला झाल्याचे आढळून आले. तत्काळ येस बॅंकेशी संपर्क करुन वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातील रक्कम ज्या ज्या बॅंकेत वळती झालेली आहे ती सर्व खाती ब्लॉक करण्याबाबत सूचना येस बॅंकेने केल्या आहेत.

Updated: May 28, 2023, 12:03 AM IST
बॅंकेचे संगणक सुरु करताच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला! तब्बल 'इतके' कोटी रातोरात झाले गायब  title=

Cyber Attack On Bank :  वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यावर ‘सायबर अटॅक’ झाला आहे. बँकेच्या खात्यातून रातोरात 1 कोटी 21 लाखांची रक्कम गायब झाली आहे. या प्रकरणी वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  येस बॅंकेची युटिलीटी हॅक करुन बॅंकेत असलेल्या वर्धा नागरी सहकारी अधिकोष बॅंकेच्या खात्यातून गायब करण्यात आला आहे.  सायबर हल्ला करुन तब्बल 1 कोटी 21 लाख 16 हजार रुपयांची रक्कम विविध खात्यात परस्पर ऑनलाईन पद्धतीने वळती करण्यात आली आहे. याप्रकरणी वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सायबर सेलकडून करण्यात येत आहे.

काय घडलंय नेमक?

वर्धा नागरी बॅंकेकडून आरटीजीएस, व नेफ्ट सुविधा देण्यासाठी येस बॅंक प्रायव्हेट लीमीटेड ही संलग्नीत बॅंक आहे. येस बॅंकेत वर्धा नागरी बॅंकेचे खाते आहे. त्या खात्यातून आरटीजीएस आणि NEFT चे व्यवहार होत असतात. 24 मे रोजी बुधवारी बॅंक बंद असताना पहाटे 6 ते सकाळी 8 या वेळेत येस बॅंकेची युटिलीटी सायबर भामट्यांने हॅक करुन सायबर अटॅक केला. यामध्ये वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातून तब्बल 1 कोटी 21 लाख 16 हजारांची रक्कम विविध खात्यात वळती केली. सकाळी बॅंक उघडल्यावर सर्व संगणक सुरु करुन तपासणी केली असता कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली.  मात्र, याच्या नोंदी कोअर बॅंकींग प्रणालीत दिसून आल्या नाहीत.

येस बॅंकेची युटिलीटी हॅक करुन वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातील रक्कम सायबर चोराने वळती केल्याचे समजले. याप्रकरणी कांचन अनिल केळकर यांनी याबाबतची तक्रार वर्धा शहर पोलिसात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सायबर सेलच्या माध्यमातून केला जात आहे.

बॅंकेच्या सर्व सिस्टीम बंद असताना 24 मे रोजी पहाटेच्या सुमारास बँकेच्या खात्यावर सायबर हल्ला झाला. सायबर सेलकडून तपास सुरु झालेला आहे.रिजर्व्ह बॅंकेला याबाबत अवगत करण्यात आलेले आहे. 

वर्धा नागरी सहकारी अधिकोष बॅंक ही रिजर्व्ह बॅंकेकडून परवाना प्राप्त बॅंक आहे. ही बॅंक वर्धा जिल्ह्यात बॅंकींग व्यवसाय करते. कोअर बॅंकींग प्रणालीवर 2013 पासून काम करीत आहे. बॅंकेचे सॉफ्टवेअर मे. नेलीटो सिस्टीम्स प्रा.ली. मुंबई यांच्याकडून घेतलेले आहे. बॅंकेच्या खात्यातून रक्कम इतर खात्यांत वळती होताच याबाबत रिजर्व्ह बॅंकेला याची माहिती देण्यात आली असून रिजर्व्ह बॅंकेच्या सतत संपर्कात वर्धा नागरी बॅंकेचे अधिकारी आहेत.रिजर्व्ह बँकेचे पथकही वर्धेत येणार आहे.

वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातून रक्कम इतर 24 विविध बॅंक खात्यात वळती झाल्याचे लक्षात येताच मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन केळकर यांनी याबाबतची माहिती रिजर्व्ह बॅंकेला दिली. तेथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत वळती झालेल्या रकमेपैकी 30 लाख रुपयांची रक्कम ब्लॉक करण्यात यश आले आहे. उर्वरित रक्कमही ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरु आहे.