Santosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण?

Santosh Deshmukh Murder Case New Photo: 9 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या प्रकरणात तपास सुरु असतानाच हा फोटो समोर आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 5, 2025, 11:28 AM IST
Santosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण? title=
विरोधी पक्षातील आमदाराने शेअर केला फोटो (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

Santosh Deshmukh Murder Case New Photo: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच एक धक्कादायक फोटो समोर आला असून या फोटोमुळे आता या प्रकरणातील तपासावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या प्रकरणाशीसंबंधीत खंडणी घेतल्याच्या आरोपाखाली बीडमधील बडे राजकीय प्रस्थ असलेल्या वाल्मिक कराडला 31 डिसेंबर रोजी सीआयडीने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला असला तरी वाल्मिक कराडला शिक्षा देण्यासाठी आवश्यक असलेला तपास ज्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे त्यांच्या विश्वासार्हतेवरच शंका घेतली जात आहे.

वाल्मिक कराड कनेक्शन

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरुन दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दिसणारे व्यक्ती हे पोलीस अधिकारी असल्याचं सांगताना आव्हाड यांनी हे लोक वाल्मिक कराडशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोतील पोलीस अधिकारी सिव्हील ड्रेसमध्ये वाल्मिक करडाच्या गळ्यात हात घालून उभा असल्याचं दिसत आहे. 

हा फोटो शेअर करताना आव्हाड काय म्हणाले?

"संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीमध्ये (विशेष तपास पथकामध्ये) एक प्रमुख IPS (पोलीस निरिक्षक) बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI (पोलीस उपनिरिक्षक) महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील?" असा सवाल आव्हाड यांनी फोटो शेअर करत उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> 'अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात...'; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं

"याच विघ्ने याने निवडणूक काळात धंनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आसल्याप्रमाणे काम केलेले आहे," असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे पुढे बोलताना, "दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा आत्यंत खास माणूस आसून गेले 10 वर्षे तो बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय," असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

वाल्मिकच्या खात्यावर त्याच दिवशीच्या फोटोंमध्ये तो धनंजय मुंडेंबरोबर

विशेष म्हणजे आव्हाडांनी वाल्मिक कराडचा पोलीस अधिकाऱ्याबरोबरचा जो फोटो शेअर केला आहे तो विधानसभा निकालाच्या दिवशीचा असल्याचा सांगण्यात आलं आहे. याच दिवशी वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेंबरोबर त्याच कपड्यात विजयाचा गुलाला उधळण्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

आव्हाडांनी केलेल्या या आरोपांवर आता गृहमंत्रालयाकडून अथवा गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडून काही स्पष्टीकरण अथवा खुलासा केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.