नाशिक : वारी निमित्ताने आज सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल वारीत शालेय मुलांनाही सहभागी करुन घेतले आहे. दरम्यान, दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाला एका भरधाव ट्रकने उडविल्याने गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नाशिकहून सायकल वारीला सुरुवात झाली. या वारीत दुसरीत शिकणारा प्रेम सचिन निफाडे सहभागी झाला होता. सायकलस्वार मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला. इतर गरजुला मदत होईल म्हणून त्याचे नेत्र आणि त्वचा काढून घेतली. पालकांनी अशा कठीण प्रसंगातही हे धाडस दाखवलं आहे.
नाशिक सिन्नर रस्त्यावर एका ट्रकने सायकल वारीत सहभागी झालेल्या प्रेमला ट्रकने धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वारीमध्ये लहान मुलांना सहभागी करुन का घेतले. लहान वयात हे कशासाठी, अशी संतप्त प्रतिक्रिया येथे उपघातानंतर पाहायला मिळाल्यात.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर अठरा वर्षांखालील मुलांचा सायकल वारीतील सहभाग स्थगित करण्यात आला आहे. सर्व मुलांना आता बसने वारीत नेण्यात येणार आहे. या अपघातानंतर सायकल वारी सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अपघाताचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर सायकलवारी रवाना होणार आहे.
सिन्नर बायपास येथे भरधाव ट्रक दारूच्या नशेत चालवत असलेल्या कृष्णा बबन राऊत (रा. राजगुरू नगर, ४९) या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलाचे शव विच्छेदनासाठी सिन्नर शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.
दारूच्या नशेत असून सुद्धा भरधाव ट्रक चालवल्याने चालकाने दुसऱ्या लेन मधून सायकलिंगला सुरुवात करत असलेल्या प्रेमला समोरून चिरडले. प्रेमला गाडीखाली येऊ न देता वाचवणे शक्य असताना ट्रक चालकाने चिरडले, अशी माहिती नाशिक सायकलीस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी दिली आहे.