जळगाव : जळगावहून-औरंगाबादकडे निघालेल्या भारत गॅस कंपनीच्या मालवाहू ट्रकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून गाडीतल्या सिलिंडरचा स्फोट झाला. वाकोद गावाजवळ मध्यरात्री ही घटना घडली. घटनेनंतर जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तब्बल ४ तास घटनास्थळी थांबून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीच्या ज्वाळा दूरवर पसरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत ट्रकची मात्र राख झाली.