धक्कादायक! धरणांच्या जिल्ह्यात पाणीपातळी खालावतेय...

 नद्या, नाले आणि धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू होते. ऑक्टोबर अखेरीस सरासरी 98 टक्के पाणीसाठा होता.  

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 10, 2018, 01:01 AM IST
धक्कादायक! धरणांच्या जिल्ह्यात पाणीपातळी खालावतेय... title=

नाशिक : नाशिकमध्ये पावसाळ्यात महापूर आला होता... महापुराने गोदामायीचं पाणी शहरात घुसलं होतं... त्यानंतर नाशिक हिवाळ्यात निचांकी तापमाने चर्चेत होतं... आता नाशिकमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हं आहेत. मार्चच्या सुरुवातीलाच हा पाणीसाठा 47 टक्क्यांवर आलाय. 

पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू

नाशिकमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील उष्णतेचं प्रमाण वाढताच नद्या, नाले आणि धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू होते. ऑक्टोबर अखेरीस सरासरी 98 टक्के पाणीसाठा होता.  

 सध्या 45 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक

गेल्या चार महिन्यात 44 टक्के पाण्याचा वापर झाला. त्यामुळे सध्या 45 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढल्यावर पाणीटंचाई जाणवणार आहे. येवला, मालेगाव, बागलाण या तीन तालुक्यातून फेब्रुवारीतच टँकरची मागणी करण्यात आलीय. गेल्यावर्षी सरासरीच्या 138 टक्के इतका पाऊस झाला. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली खरी. मात्र थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असतो. 

एकट्या गंगापूर धरणात 76 टक्के पाणी

गंगापूर धरण समूहात 70 टक्के पाणीसाठा आहे. त्यात एकट्या गंगापूर धरणात 76 टक्के पाणी आहे. कश्यपी धरणात 93 टक्के, आळंदीत 62 टक्के पाणी आहे. पालखेड धरण समुहातून आवर्तन सोडण्यात आल्याने 29 टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात पालखेड धरणात 46 टक्के, दारणा धरणात 71 टक्के, ओझरखेड धरणात 65 टक्के पाणी आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूरमध्ये 61 टक्के, हरणबारीत 35 टक्के, तर गिरणात 29 टक्केच साठा आहे. 

आरक्षित पाणी विविध धरणातून सोडण्यात येणार

विशेष म्हणजे यावर्षी गिरणा धरण दहानंतर प्रथमच पूर्णपणे भरलं होतं. या धरणातील 70 टक्के पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यात झालाय. फेब्रुवारी अखेरपासून सिंचनासाठी असलेलं आरक्षित पाणी विविध धरणातून सोडण्यात येणार आहे. यापुढच्या काळात पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकूण 47 टक्के साठ्याचा काटकसरीने वापर करावा लागेल.