राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा, टक्केवारी पाहून म्हणाल 'वर्षभर पुरणार का?'

Maharashtra Rain News: राज्यात जुलैमध्ये पावसाने सरासरी ओलंडली होती. मात्र ऑगस्टमध्ये जोर कमी होण्याची शक्यता आहे. अशातच धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या.  

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 12, 2024, 09:04 AM IST
राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा, टक्केवारी पाहून म्हणाल 'वर्षभर पुरणार का?' title=
Dam levels better than last year in maharashtra

Maharashtra Rain News: राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. मात्र, ऑगस्ट उजाडताच पावसाचा जोर ओसरला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी असेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळं धरणातही पुरेसा पाणीसाठी जमा झाला आहे. राज्यातील धरणातील सध्या काय परिस्थिती आहे. व कोणत्या विभागात किती पाणीसाठा आहे, हे जाणून घेऊया. 

जुलै महिन्यात पावसाने राज्यात थैमान घातलं होतं. तर, त्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाने उघडिप दिली आहे. मराठवाड्यात मात्र हवा तसा पाऊस न झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं भाकित हवामान विभागाने केलं आहे. त्यामुळं धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठी आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या राज्यातील धरणांत  ९६५.३२ टीएमसी पाणीसाठा आहे. 

जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांची (साठवण क्षमतेनुसार) एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४३०.६३ टीएमसी इतकी आहे. त्यापैकी ९६५.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राज्यातील प्रमुख मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४३०.६३ टीएमसी इतकी असून, धरणांत सरासरी ६७.५० टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीपातळी वाढल्याचे समोर आले आहे. गतवर्षी 60.55 टक्के पाणीसाठा धरणात होता. 

पुणे विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता ५३७.२८ टीएमसी असून, धरणांत ८३ टक्के म्हणजे, ४४६.०४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठ्याबाबत पुणे विभाग राज्यात आघाडीवर आहे. कोकण विभागाची एकूण पाणी साठवण १३०.८४ टीएमसी असून, पाणीसाठा सुमारे ८९.२६ टक्के, म्हणजे ११६.७७ टीएमसी इतका झाला आहे. नाशिक विभागाची एकूण पाणी साठवण क्षमता २०९.६१ टीएमसी असून, पाणीसाठा ६१.४२ टक्के, म्हणजे १२८.७५ टीएमसी इतका झाला आहे. मराठवाडा विभागाची एकूण पाणी साठवण क्षमता २५६.४५ टीएमसी असून, धरणांतील पाणीसाठा जेमतेम २६.४५ टक्क्यांवर गेला आहे. धरणांतील पाणीसाठा ६७.८१ टीएमसी झाला आहे. अमरावती विभागातील धरणांची पाणीसाठवण क्षमता १३६.७५ टीएमसी आहे. धरणांत सुमारे ६३.८४ टक्के म्हणजे ८३.९१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १६२.७० टीएमसी आहे. धरणांत ७५.०२ टक्के, म्हणजे १२२.०३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

विभागनिहाय पाणीसाठा

कोकण – ११६.७७ (८९.२६)
नाशिक – १२८.७५ (६१.४२)
मराठवाडा – ६७.८१ (२६.४५)
पुणे – ४४६.०४ (८३.०६)
अमरावती – ८३.९१ (६२.८४)
नागपूर – १२२.०३ (७५.०२)
एकूण – ९६५.३२ (६७.५०)