दांडियाच्या तालावर थिरकत एकमेकांना शह काटशह

नागरीक धडपडतायत, पाऊस नसल्यानं कोरड्या खड्ड्यातली माती वाहनांबरोबर हवेत उडते. मग कल्याण डोंबिवलीकरांना श्वसनाचे विकार वगैरे होतात.

Updated: Sep 25, 2017, 11:39 PM IST
दांडियाच्या तालावर थिरकत एकमेकांना शह काटशह title=

विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण - डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत सध्या धूम आहे ती दांडियाची, आणि या दांडियाचे रास रचयते आहेत ते इथले राजकारणी. कल्याण डोंबिवलीकर जनता एरव्ही काय खस्ता खाते, याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नाही. त्यांचं आपलं गरबा घुमतो जाए मस्त रंगलंय.

कल्याण डोंबिवलीकर जनता रोजच चांद्रसफरीचा आनंद लुटलतात. इथल्या रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठाल्या खड्ड्यांमुळं. पावसाळा अजून संपलेला नाही. सालाबादप्रमाणं यंदाही रस्त्यात खड्डे पडलेत. त्यात वाहनं आपटतायत.

नागरीक धडपडतायत, पाऊस नसल्यानं कोरड्या खड्ड्यातली माती वाहनांबरोबर हवेत उडते. मग कल्याण डोंबिवलीकरांना श्वसनाचे विकार वगैरे होतात.

झी २४ तासनं याआधीच या शहरांचं वर्णन बजबजपुरी असं केलं होतं. पण याचं कल्याण डोंबिवलीच्या नेत्यांना काहीच पडलेलं नाही. ते तर मस्त रंगलेत ते दांडिया खेळण्यात. कुणी रासगरबा मांडलाय, तर कुणी नमो दांडिया. आता राजकारण म्हटलं की दांडीवर दांडी आपटायचीच. पण इथं दांडियाच्या तालावर थिरकत एकमेकांना शह काटशह दिले जातायत.

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा रासगरबा फुल्ल फॉर्मात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी चक्क नमो गरबा आयोजित केलाय. सत्ताधारी मित्रात अशी ठसन सुरू असताना शिवसेना नेते रमेश म्हात्रे यांनी भाजपच्या दांडियाला हजेरी लावली. त्यामुळे अर्थातच डोंबिवलीत चर्चेला विषय मिळाला.

काही गोष्टी बोलायच्या नसतात तर करून दाखवायच्या असतात असं सूचकपणं सांगत रमेश म्हात्रेंनी दांडियात आणखी संगीत ओतलं, असो, सध्या कल्याण डोंबिवलीच्या नेत्यांनी दांडियावर फेर धरलाय. या निमित्तानं एकमेकांना टाळ्या देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कल्याण डोंबिवलीकर मुकी बिचारी सर्वसामान्य जनता मात्र दांडियाची गाणी ऐकत खड्ड्यातून कशीबशी वाट काढतेय.