close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आंबोली घाटातून प्रवास करताय? हे ध्यानात ठेवा...

पर्यटकांना सुरक्षेच्यादृष्टीने मुख्य धबधब्याजवळ जाण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आलीय

Updated: Aug 13, 2019, 09:30 PM IST
आंबोली घाटातून प्रवास करताय? हे ध्यानात ठेवा...

प्रणव पोळेकर, झी २४ तास, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या ठिकाणी दरड कोसळल्याने अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीय. हलक्या वाहनांना सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकेरी वाहतुकीसाठी आंबोली घाट सुरु ठेवण्यात आलाय. घाट सुरळीत होण्यासाठी साधारणता एक ते दीड महिना लागणार आहे.

का बनलाय घाट असुरक्षित?

मोबाईल कंपन्यांच्या खोदकामामुळे सध्या सिंधुदुर्गातील आंबोली घाट धोकादायक बनलाय. या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळतायत. रस्ता वाहून जातोय. त्यामुळे हा धोकादायक बनलाय. या कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याच्या बाजूचे संरक्षक कठडे पूर्णपणे तुटून गेलेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्यात. तसंच चुकीच्या खोदकामाची चौकशी करण्याचं आश्वासन केसरकरांनी दिलंय.

अवजड वाहनांना बंदी

आंबोली घाटातून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद केलीय. पर्यटकांना सुरक्षेच्यादृष्टीने मुख्य धबधब्याजवळ जाण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आलीय. खरंतर वर्षा पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटकांना धबधब्यापाशी जाण्यास मनाई केली जातेय.

आंबोली घाट असुरक्षित

आंबोली घाटात दरड कोसळल्याने पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय. त्या ठिकाणच्या व्यावसायिकांनी आपले हॉटेल्सही पूर्णपणे बंद केलेत. आंबोली घाटाच्या कठड्यालगत संपूर्ण १५ किमीपर्यंत खोदकाम केल्याने संपूर्ण कोठडे कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे आंबोली घाट सध्या असुरक्षित बनलाय.