अकोला : नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडी आहे. केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय देशहितातून नव्हे तर, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व इतर डिजीटल पेमेंट करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावातून घेतला आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी केला आहे.
अकोला येथे पत्रकार परिषदेत पृथ्विराज चव्हाण बोलत होते. या वेळी बोलताना चव्हाण यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या माध्यमातून देशात कारस्थान रचले. ज्यामुळे देशातील शेतकरी, व्यापारी, युवक संकटात सापडला असून, अर्थव्यवस्था कोलमडल्याचा आरोप केला. निवडणुकीपूर्वी 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत मोदींनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, हमीभाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करू अशी अनेक आश्वासने दिली. निवडून आल्यावर मात्र जनतेला ठेंगा दाखवला, असे चव्हाण यांनी म्हटले.
चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला, कर्जमाफीच्या मुद्द्यावर तर सुरूवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी नकारघंटा दाखवली होती. पण, कॉंग्रेस आणि इतरांच्या आंदोलनामुळे दिल्लीचा नाईलाज झाला. मग दिल्लीच्या आदेशानुसार राज्यात कर्जमाफी केली. पण, ती कर्जमाफीही फसवी असून, अर्ज भरण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा छळ चालला आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुढे बोलतान , भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला. पण, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री प्रकाश मेहता, सुभाष देसाई, आयएएस अधिकारी मोपलवार यांना मुख्यमंत्री का पाठीशी घालत आहेत? मोपलवार प्रकरणात तर इतर पक्षाच्या नव्हे तर, खुद्द भाजपच्याच आमदाराने पुरावे दिले. तरीसुद्धा सरकार तिकडे लक्ष देत नाही. मग इतरांना वेगळा न्याय आणि खडसेंना वेगळा न्याय का? असा सवालही पृथ्विराज चव्हाण यांनी व्यक्त केला.