जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीची कारवाई

Updated: Jul 2, 2021, 04:08 PM IST
जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया title=

पुणे : साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाई केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. ईडीच्या या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्देशानेच कारखान्याची विक्री झाली, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढलेत. ज्या गुरू कमोडिटीजने करार करून कंपनी चालवण्यास घेतली. त्या गुरू कमोडिटीजसोबत आपला काहीही संबंध नाही असंही अजित पवारांनी म्हंटलं आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून विक्री करण्यात आली. हा कारखाना विकत घेण्यासाठी 12 ते 15 कंपन्यांनी टेंडर भरलं होतं. पण यामधील सर्वात जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने भरलं होतं. त्यांनी 65 कोटींचं टेंडर भरला. आणि तो विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

गुरू कमोडिटीने घेतलेला कारखाना बीव्हीजीने चालवण्यासाठी मागितला होता. त्यांना पाहिल्या वर्षात तोटा झाला. ते बॅकफुटवर गेल्यावर माझे एक नातेवाईक राजेंद्र घाडग यांनी तो चालवायला घेतला. त्यांनाही तोटा झाला. त्यांनी रीतसर परवानगी घेऊन कारखान्याची कॅपसीटी वाढवली त्यासाठी कर्ज घेतलं. त्यात पुणे जिल्हा सहकारी बँक आणि इतर बँक आहेत. ते कर्ज व्यवस्थित फेडलं जात आहे. “ईडीकडून गुरु कमोडिटीच्या संदर्भात काहीतरी चौकशी सुरु आहे. कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असल्याने टाच आणली आहे. 

माझ्यावर झालेले आरोप राजकीय हेतूने

जरंडेश्वर प्रकरणात याआधीही विविध तपास यंत्रणांनी चौकशी केली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे यात जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय असंही अजित पवार म्हणालेत. अनेक कामगारांचे भवितव्य या कारखान्यावर अवलंबून आहे. त्यामुळे वकिलांचा सल्ला घेऊन कंपनीवर असणारे डायरेक्टर कोर्टात जातील असंही अजित पवारांनी सांगितलं. 

जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. 
ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना आणि मशिनरी जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.