'डिटेक्टिव्ह' देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता 'या' आमदारांच्या संशयाची सुई

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाचे फोन टँपिंग प्रकरण बाहेर काढले.

Updated: Mar 14, 2022, 09:49 PM IST
'डिटेक्टिव्ह' देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता 'या' आमदारांच्या संशयाची सुई title=

मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाचे फोन टँपिंग प्रकरण बाहेर काढले. यात काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही नाव समोर आले आहे. यावरून नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर टीका केलीय.

विधानमंडळाच्या २०२१ च्या अधिवेशनात काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी फोन टॅपिंग होण्याचा विषय मांडून त्यावर चौकशीची मागणी केली होती. २०१५ ते २०१९ या काळात झालेल्या फोन टॅपिंगची पडताळणी करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली.

या समितीच्या अहवालात आमदार नाना पटोले यांचे नाव अमजदखान, बच्चू कडू यांना निजामुद्दीन बाबू शेख नागपाडा, मुंबई, भाजप खासदार संजय काकडे यांना तरबेज सुतार, कात्रज, आशिष देशमुख यांना रघू चोरगे, हिना महेश साळुंखे ही नावे देण्यात आल्याचे समोर आले.

फडणवीस यांच्या कार्यकाळात झालेल्या या प्रकरणात ज्या आमदारांची नावे समोर आली त्यांनी आपल्या संशयाची सुई 'डिटेक्टिव्ह' देवेंद्र यांच्यादिशेने वळवली आहे. नाना पटोले हे भाजपचे खासदार असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर, नागपूरचेच आमदार आशिष देशमुख यांनी भाजपला सोडचिट्ठी देत काँग्रेस प्रवेश केला होता.

याच दरम्यान, खासदार संजय काकडे यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले होते. तर, अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यावरून फडणवीस सरकारला अडचणीत आणले होते. ज्यावेळी अन्य पक्षातील आमदार भाजपात येत होते. त्याचवेळी काही आमदार, खासदार यांनी अन्य पक्षात प्रवेश केला होता. नेमकी हीच बाब गृहमंत्री वळसे पाटील यांनी सभागृहात उघड केली.

त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या राजकारणाला काळिमा फासण्याचा प्रकार सुरू आहे. राज्याच्या हितासाठी जनता आमदारांना निवडून सभागृहात पाठवतात. त्याच लोकप्रतिनिधीना बदनाम करण्याचे काम जर फडणवीस यांच्या काळात झाले असेल तर त्याचे उत्तर फडणवीस यांना द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नाना पटोले पुढे म्हणाले की, हिंदू - मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे अशी नावे देऊन फोन टॅप केले गेले. मी कुणाची जात काढणार नाही. पण, माझे नाव अमजद खान असे का देण्यात आले याचे उत्तर मला फडणवीस यांच्याकडून हवे आहे, असेही नाना पटोले म्हणाले.