अहो काय सांगता! 7 वर्षीय मुलाच्या आधार कार्डवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो, चंद्रपुरातील अजब प्रकार

Devendra Fadanvis: चंद्रपुरात एक अजब प्रकार समोर आला आहे. यात एका सात वर्षांच्या मुलाच्या आधार कार्डवर चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. यामुळं संपूर्ण राज्यात एकच चर्चेचा विषय ठरत आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 23, 2023, 06:27 PM IST
अहो काय सांगता! 7 वर्षीय मुलाच्या आधार कार्डवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो, चंद्रपुरातील अजब प्रकार title=
अहो काय सांगता! 7 वर्षीय मुलाच्या आधार कार्डवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो, चंद्रपुरातील अजब प्रकार| Devendra Fadanvis Photo On 7 years Old Aadhar Card In chandrpur News

आशीष अम्बाडे, झी मीडिया

Chandrpur News Today: चंद्रपुरात (Chandrpur) सात वर्षीय मुलाच्या आधार कार्डवर (Aadhar Card) चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा फोटो असल्याचा खळबळजनक फोटो समोर आला आहे. जिगल सावसाकडे असं या मुलाचं नाव आहे. सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा या गावातील तो रहिवासी आहे. मुलाच्या पालकांनी अनेकवेळा त्याच्या आधार कार्डमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलं. (Devendra Fadanvis Photo On 7 years Old Aadhar Card)

आधार कार्डवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो

चंद्रपूर जिल्ह्यातील एका सात वर्षीय मुलाच्या आधारकार्डवर तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असल्याचा अजब प्रकार समोर आलाय. जिगलचा जन्म त्याच्या आजोळी म्हणजे चिमूर तालुक्यातील शिवरा या गावात झाला होता. तेव्हा त्याच्या आईने गावाजवळ असलेल्या शंकरपूर येथे त्याचे आधार कार्ड काढले होते. मात्र हे आधार कार्ड जेव्हा घरी आले तेव्हा त्यावर जिगलच्याऐवजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता. यामुळं जिगलचे पालकही चक्रावले होते. हा नेमका काय प्रकार आहे? हे त्यांना कळत नव्हते.

आधार केंद्रात पालकांची धाव

जिगलच्या आई-वडिलांनी अनेकवेळा आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी प्रशासनाकडे खेटा घातल्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अधिकाऱ्यांनी ५ वर्षांनंतर आधार कार्डमध्ये बदल करता येईल असं त्यांना सांगितले होते. त्यामुळं मुलाने वयाची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आधार अपडेट करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तहसीलदार चिमूर यांच्या आदेशानंतर आधार अपडेटची प्रक्रिया लगबगीने सुरू करण्यात आली. प्रशासनाने आपली चूक दुरुस्त केली असून आता जिगलचा फोटो आधार कार्डवर अपडेट केला आहे. तसंच, ही चूक करणाऱ्या एजन्सीबाबत चौकशी करणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. मात्र या प्रकारामुळं प्रशासनाच्या सावळा गोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आधार कार्डसाठी मुलाचा फोटो काढताना त्याचे मागे फडणवीसांचे पोस्ट होते. फोटो काढताना मुलाने चुळबुळ केल्याने चुकून फडणवीसांचा फोटो आधार कार्डवर आला असावा, अशी प्रतिक्रिया चिमूरच्या तहसीलदारांनी दिली आहे.